नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. उत्तर प्रदेशातील प्रत्येक नदीत वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन करु, असे त्यांनी सांगितले. 
  
 यावेळी योगी आदित्यनाथ यांनी राजकीय कारकीर्दीची प्रशंसा केली. अटलजींमुळे देशात राजकीय स्थैर्य निर्माण झाले. त्यांनी नेहमीच वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. यामुळेच राजकारणात स्थिरता निर्माण झाली. उत्तर प्रदेशातील प्रत्येक नदीत त्यांच्या अस्थी विसर्जित करणे, हीच आमची त्यांना मानवंदना असेल, असे योगींनी सांगितले. याशिवाय, उत्तर प्रदेश सरकारने शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
 
 दरम्यान, केंद्र सरकारने वाजपेयींच्या निधनानिमित्त देशभरात ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात देशभरातील सर्व प्रमुख सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज हे अर्ध्यावर फडकावले जातील. वाजपेयींचे दीर्घ आजाराने दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारांदरम्यान गुरुवारी निधन झाले, ते ९३ वर्षांचे होते.