नवी दिल्ली: अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सरकार विरोधकांशी कधीही सूडबुद्धीने वागणार नाही, हा विश्वास विरोधकांना होता. वाजपेयींचे विरोधकांशी मतभेद असतील. पण त्यामुळे त्यांनी कधीही कोणावर सूड उगवला नाही. त्यांचा हाच गुण विरोधकांना कायम आकर्षित करायचा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केली. 
 
 आपल्याकडे पंडित जवाहरलाल नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांपासून राजीव गांधींसारखे तरुण नेतेही होऊन गेले. मात्र, गेल्या तीन दशकांचा विचार केल्यास कोणता राजकीय नेता लक्षात राहिला असेल तर तो म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. 
 
 आंतरराष्ट्रीय पातळीवरही अटल बिहारी वाजपेयी यांना मानाचे स्थान होते. ते चांगले वक्ते आणि उदार मनोवृत्तीचे होते. मात्र, या सगळ्यापेक्षा त्यांचा आणखी एक गुण महत्त्वाचा होता. तो म्हणजे उजव्या विचारसरणीचे असूनही त्यांनी इतर पक्षाच्या नेत्यांशी कायम सौहार्दापूर्ण संबंध राखले. ते विरोधी पक्षातील नेत्यांशी कधीही शत्रुत्वाच्या भावनेने वागले नाहीत. त्यामुळेच अटलजी पंतप्रधान असताना सरकार आपल्याशी कधीही सूडभावनेने वागणार नाही, हा विश्वास विरोधकांना असल्याचे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.