नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ९३ व्या वर्षी गुरुवारी दीर्घ आजाराने निधन  झाले. सकाळी ११ च्या सुमारास त्यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल झालंय... इथे दुपारी १.०० वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. दुपारी १.०० वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी ४.०० वाजता यमुना नदीच्या किनारी राजघाटाजवळ राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भाजप मुख्यालयात आणण्याअगोदर अटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील ६-ए कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी ११.०५ : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल... दुपारी १.०० वाजेपर्यंत भाजप मुख्यालयात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाणार आहे



सकाळी १०.५० : थोड्याच वेळात वाजपेयींचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल होणार 


सकाळी १०.४० : आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी भाजप मुख्यालयासमोर प्रचंड गर्दी  



सकाळी १०.०० : 'गार्ड ऑफ ऑनर'नंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे नेण्यासाठी रवाना.... लष्कराच्या सजवलेल्या गाडीतून सरकारी निवासस्थानाहून भाजप मुख्यालयाकडे प्रवास सुरू 


सकाळी ९.५५ : सर्वोच्च न्यायालय आणि नोंदणी कार्यालयाचंही कामकाजही आज अर्धा दिवस चालणार आहे... केवळ दुपारी १.०० वाजेपर्यंत कामकाज सुरू राहील


सकाळी ९.५० : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा भाजप मुख्यालयात दाखल


सकाळी ९.४० : थोड्याच वेळात अटलजींचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे निघणार... पक्ष मुख्यालयाकडे नेण्याची तयारी पूर्ण


सकाळी ९.२० : अटलजींच्या निवासस्थानासमोर एकच गर्दी 


सकाळी ९.१० :  आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी दाखल


सकाळी ९.०० : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सकाळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन अटलजींना श्रद्धांजली वाहिली


सकाळी ८.३५ :  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी निवासस्थानी दाखल


सकाळी ८.२० : लष्कराच्या तीनही दलांचे प्रमुख उपस्थित... लष्कराच्या तीनही प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण करत माजी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली 


सकाळी ८.०० : सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज सकाळी अटलजींच्या घरी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली


सकाळी ७.४० : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांनीही अटलजींना आज त्यांच्या घरी जाऊन आदरांजली अर्पण केली. वाजपेयींच्या जाण्यानं देनानं सर्वोच्च नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना यावेळी दोघांनी व्यक्त केली.


 


 


अंत्ययात्रेसाठी सेनेचे सजवलेले ट्रक 

पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. देशाच्या भविष्याला दिशा देणारे तसेच आपले सर्वांचे प्रेरणास्थान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले आहे. अटलजींच्या रुपाने भारताने आज आपला 'अनमोल', 'अटल रत्न' गमावले आहे. वाजपेयींच्या जाण्याने माझं पितृछत्र हरपलं आहे', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अटलजींच्या निधनाने राष्ट्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. अटलजी हे एक लोकनायक, प्रखर वक्ते, ओजस्वी कवी, पत्रकार, आंतरराष्ट्रीय प्रभावशाली व्यक्तीमत्व होते. तसेच ते मां भारतीचे खरे सुपुत्र होते. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला. वाजपेयींनी संघटन आणि शासन या दोन्ही गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो, असं मोदी म्हणाले. ज्यावेळी मला वाजपेयी भेटत त्यावेळी ते वडिलांसारखे गळाभेट घ्यायचे आणि आत्मियतेने माझी विचारपूस करायचे. ते गेल्याने माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांनी भाजपचे विचार आणि धोरण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. वाजपेयींचे निधन झाले असले तरी त्यांची वाणी, त्यांचे जीवन सर्व भारतवासियांना प्रेरणा देत राहतील. त्यांचे ओजस्वी, तेजस्वी आणि यशस्वी व्यक्तीत्व नेहमी देशातील लोकांना मार्गदर्शन करेल, असे मोदींनी म्हटले आहे.