अतिकला स्वतःवरच बॉम्बहल्ला का करुन घ्यायचा होता? अतिकच्या सुटकेचा प्लॅन पोलिसांच्या हाती
Atiq Ahmed Murder : पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदची हत्या करण्यात आली होती. मात्र अतिक-अश्रफ हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.
Crime News : काही दिवसांपूर्वी कुख्यात गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची प्रयागराजमध्ये (Prayagraj) पोलीस (UP Police) बंदोबस्तामध्ये हत्या करण्यात आली होती. 15 एप्रिलच्या रात्री अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलबाहेर गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तीन हल्लेखोरांनी पोलिसांची कडेकोट सुरक्षा असतानाही दोघांवर हल्ला केला होता. या हत्येनंतर अतिक अहमद आणि त्याच्या भावाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी अतिक अहमदने स्वतःवरच हल्ला करण्यासाठी कट रचल्याचाी माहिती पोलिसांनी दिली होती. या कामासाठी अतिक अहमदने गुड्डू मुस्लिमची (Guddu Muslim) निवड केली होती अशीही माहिती समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता अतिकने स्वतःवर हल्ला करण्याची योजना का आखली होती याची माहिती समोर आली आहे.
गुड्डू मुस्लिमला दिली होती हल्ल्याची जबाबदारी
पोलीस कोठडीत असतानाच अतिक अहमदने स्वत:वर हल्ला करण्याचा कट रचल्याचा दावा पोलिसांनी त्यांच्या तपासात केला आहे. गोळीबार आणि बॉम्बस्फोट करून अतिक अहमदला स्वतःवर हल्ला करुन घ्यायचा होता. यासाठी त्याने त्याचा खास शूटर गुड्डू मुस्लिम याच्याकडे जबाबदारी सोपवली होती. गुड्डू मुस्लिमने पूर्वांचलमधील काही गुन्हेगारांसोबतही संपर्क साधला होता. या खुलाशानंतर अतिक अहमदला स्वतःवरच हल्ला का करवून घ्यायचा होता असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कशासाठी आखली होता कट?
पोलिसांच्या दाव्यानुसार भविष्यात त्याची सुरक्षा अधिक मजबूत करता यावी यासाठी अतिकला स्वतःवर हल्ला करवून घ्यायचा होता. गोळीबार आणि बॉम्ब हल्ला करून त्याला आपली सुरक्षा मजबूत करायची होती. अतिकला स्वतःवर असा हल्ला घडवून आणायचा होता ज्यामुळे त्याला इजा होणार नाही पण त्याच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होतील. यानंतर मग त्याची सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल. यामुळे भविष्यात माझ्यावर कोणीही हल्ला करू शकणार नाही, असे अतिकला वाटत होते. दुसरीकडे 2002 मध्येही अतिक अहमदनेही स्वत:वर हल्ल्याचे नाटक रचले होते. 2002 मध्ये, न्यायालयात हजर केले जात असताना, पोलीस कोठडीत अतिकवर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी अतिक किरकोळ जखमी झाला होता. तपासात अतिकनेच हा हल्ला केल्याचे समोर आले.
दुसरीकडे, साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणले जात असतानाही अतिकला फेक एन्काऊंन्टर होण्याची भीती होती. विकास दुबे प्रकरणाप्रमाणेच आपल्या बाबतीतही असेच काही घडेल का, असा प्रश्न त्याच्या मनात येत होता. मात्र साबरमतीहून तो सुखरूप प्रयागराजला पोहोचला होता. माध्यमांनीही त्यावेळी साबरमती ते प्रयागराज या मार्गावरुन वार्ताकन केले होते.
मृत्यूच्या काही सेकंद आधी अतिकने इशारा दिला होता का?
अतिक अहमदच्या हत्येनंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रुग्णालयाच्या गेटवर पोलीस जीपमधून खाली उतरताना अतिक अहमद क्षणभर थांबल्याचे दिसत होते. खाली उतरण्यापूर्वी आतिकचा एक पाय जीपमध्येच होता. तो जीपच्या बाजूला उभा होता, तेवढ्यात त्याची नजर हॉस्पिटलकडे गेली. सुमारे चार सेकंद तो तिथे पाहत राहिला. यानंतर त्याने मान हलवली आणि हातवारे केले आणि मग गाडीतून खाली उतरला. हॉस्पिटलच्या आवारात पोहोचताच हल्लेखोरांनी त्याच्याव गोळीबार केला.