Atishi Marlena  new cheif minister of delhi  : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून जामीनावर बाहेर आल्यावर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपण दोन दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटल होतं. त्यानुसार केजरीवालांनी मंगळवारी राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ घेतला असून ते आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. केजरीवालनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी अतिशी मार्लेना यांची निवड करण्यात आली आहे. आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदासाठी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी मान्यता दिली असून अतिथी या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. 


कोण आहेत अतिशी मार्लेना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशी मार्लेना या केजरीवालांच्या मंत्री मंडळात शिक्षण आणि पीडब्ल्यूडी सहित अनेक खाती सांभाळत होत्या. अतिशी या आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासूनच पक्षाशी जोडल्या गेल्या होत्या. आम आदमी पार्टीने 2013 मध्ये दिल्लीत पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा आतिशी यांना जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीमध्ये स्थान देण्यात आले होते. त्या काळात त्यांनी पक्षाची धोरणे ठरवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांसोबत काम केले. गेल्या काही वर्षांत त्या पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून पुढे आल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याही त्या सल्लागार होत्या. अतिशी हे आम आदमी पक्षातील सर्वात मोठी पॉलीटिकल अफेयर्स कमेटीच्या सदस्य देखील आहेत.


काय म्हणाले होते केजरीवाल?


रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या आम आदमी पार्टीच्या मुख्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपण दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हंटले. जो पर्यंत जनता त्यांचा निर्णय देत नाही, तो पर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही असे म्हटले आहे. केजरीवाल म्हणाले, 'मी प्रत्येक घर आणि गल्लीबोळ्यात जाईन. जोपर्यंत जनतेचा निर्णय मिळत नाही तो पर्यंत मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसणार नाही'. ते पुढे म्हणाले होते की, 'फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार आहेत, पण महाराष्ट्राच्या निवडणुकांबरोबरच नोव्हेंबरमध्ये इथेही निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. निवडणुका होईपर्यंत पक्षातील दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री होईल. येत्या दोन-तीन दिवसांत आमदारांची बैठक होणार असून, त्यात पुढील मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेतला जाईल'.


दिल्लीला मिळणार महिला मुख्यमंत्री : 


दिल्लीला पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्री मिळणार आहे. यापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी तब्बल 15 वर्ष दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला होता. अरविंद केजरीवालांनंतर मुख्यमंत्री पदासाठी अतिशी मार्लेना, गोपाल राय, कैलाश गहलोत आणि सौरभ भारद्वाज यांच्या नावाची चर्चा होती. मात्र मंगळवारी अरविंद केजरीवाल यांनी आमदारांच्या बैठकीत स्वतः अतिशी मार्लेना यांच्या नावाचा प्रस्ताव दिला, ज्याला सर्वांनी संमती दिली.