ATM मधून होणारे व्यवहार मोफत नसतात, एका मर्यादेनंतर व्यवहारांवर आकारले जातात जास्तीचे पैसे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना 1 जानेवारी 2022 पासून मासिक व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रती व्यवहाराला 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली होती.
मुंबई : आपण आपल्या सगळ्या पैशांच्या व्यवहारासाठी कोणत्या ना कोणत्या बँकेवर अवलंबून राहातो. बँका आपल्या सर्विवेस देखील देतात. जसे की, इंटरनेट बँकिंग, लॉकर, एटीएम, कर्ज इत्यादी. परंतु त्या बँका खाजगी असोत की सरकारी, त्या आपल्याला पुरवलेल्या सर्विसेससाठी एक ठरावीक रक्कम एका विशिष्ट वेळेत घेतात. एवढच काय तर या बँका प्रत्येक महिन्याला एका निश्चित मर्यादेपर्यंत मोफत एटीएम व्यवहार देतात.
परंतु या विनामूल्य व्यवहारानंतर बँका ग्राहकांकडून शुल्क आकारतात. तुमच्या एटीएममध्ये तुमच्या मोफत व्यवहारांची संख्या तुमच्या खाते आणि डेबिट कार्डच्या प्रकारावर अवलंबून असेल.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना 1 जानेवारी 2022 पासून मासिक व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रती व्यवहाराला 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली होती. यापूर्वी अशा व्यवहारांसाठी बँका 20 रुपये आकारत असत.
तुमच्या बँकेच्या ATM वर 5 मोफत व्यवहारांना परवानगी आहे
ग्राहक त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला 5 विनामूल्य व्यवहार करू शकतात, तर इतर बँकांच्या एटीएममधून एका महिन्यात 3 विनामूल्य व्यवहार करता येतात. मेट्रो नसलेल्या शहरांमधील इतर बँकांच्या एटीएममधून 5 मोफत व्यवहार करता येतील.
RBI ने बँकांना 1 ऑगस्ट 2022 पासून सर्व केंद्रांवर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 17 रुपये आणि प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारासाठी 6 रुपये इंटरचेंज शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे.
बँका एटीएमच्या स्थापनेचा आणि देखभालीचा खर्च वसूल करण्यासाठी एटीएम सेवा शुल्क देखील आकारतात. SBI, पीएनबी, एचडीएफसी, ICICI आणि अॅक्सिस बँक किती एटीएम चार्ज आकारते आम्ही तुम्हाला जाणून घेण्यात मदत करणार आहोत.
SBI एटीएम व्यवहार मर्यादा आणि शुल्क
दुसऱ्या बँकेच्या ग्राहकाने मर्यादेनंतर एसबीआय एटीएममधून त्याच्या डेबिट कार्डमधून पैसे काढल्यास, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या कार्डधारकांकडून 20 रुपये + GST आणि 10 + GST आकारेल.
गैर-आर्थिक व्यवहारांसाठी, SBI इतर बँक ग्राहकांकडून रुपये 8+ GST आणि SBI खातेधारकांकडून रुपये 5+ GST आकारेल.
तसेच जर खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास, SBI बँकेच्या एटीएम आणि इतर बँकांच्या एटीएममध्ये ग्राहकांकडून 20 रुपये + जीएसटी आकारले जाईल.
ICICI बँक एटीएम व्यवहार मर्यादा आणि शुल्क
आयसीआयसीआय बँकेसोबत व्यवहार करणाऱ्या इतर बँक एटीएमसाठी रोख रक्कम काढण्याची मर्यादा 10 हजार रुपये आहे. RBI ने 5 वेळा मोफत व्यवहाराची सुविधा दिली आहे. यानंतर ग्राहकाला व्यवहारांसाठी 21 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 8.50 रुपये द्यावे लागतील.
HDFC बँक एटीएम व्यवहार मर्यादा आणि शुल्क
जर इतर बँकांच्या ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून डेबिट कार्डने पैसे काढले, तर ते एकावेळी 10 हजार रुपये काढू शकतील. पगार खाते असलेल्यांना बचत खात्यासह 5 विनामूल्य व्यवहार देखील मिळतील.
जर तुम्ही एचडीएफसी बँकेतून विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढले, तर बँक तुमच्याकडून आर्थिक व्यवहारांसाठी 21 रुपये आणि बिगर आर्थिक व्यवहारांसाठी 8.50 रुपये + GST आकारेल.
अॅक्सिस बँक एटीएम व्यवहार मर्यादा आणि शुल्क
जर तुम्ही अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून दुसऱ्या बँकेच्या डेबिट कार्डमधून पैसे काढले, तर तुम्ही एकावेळी 10 हजार रुपये काढाल. निर्धारित वेळेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास 20 रुपये शुल्क आकारले जाईल.