सावधान...! धर्मांतराच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, २ अटकेत, धर्मांतरासाठी विवाहदेखील लावले
लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे मुद्दे नेहमी उत्तर प्रदेशात चर्चेत असतातच.. पण आता पैसे किंवा नोकरीचं आमिष दाखवून हजारो लोकांचं धर्मांतर
नोएडा : लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे मुद्दे नेहमी उत्तर प्रदेशात चर्चेत असतातच.. पण आता पैसे किंवा नोकरीचं आमिष दाखवून हजारो लोकांचं धर्मांतर केल्याची बाब नॉएडामध्ये समोर आलीये... धक्कादायक बाब म्हणजे एका शाळेतील मुकबधीर मुलांनाही टार्गेट केलं गेलंय. उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये धर्मांतराच्या एका मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी जहांगीर आणि उमर गौतम या दोघांना अटक करण्यात आलीये. पैसे आणि नोकरीचं आमिष दाखवून हे धर्मांतर झाल्याची माहिती ATSच्या तपासात समोर आलीये. धक्कादायक बाब म्हणजे नोएडामधील एका मूक-बधीर संस्थेतल्या 18 मुलांचंही धर्मांतर केलं गेलंय. धर्मांतरासाठी विवाहदेखील लावले जात असल्याची माहिती आहे.
गाझियाबादमध्ये दाखल झालेल्या एका तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आलं. गेल्या दोन वर्षांपासून ही गँग काम करत असून जहांगीर आणि उमरच्या गँगनं तब्बल 1 हजार जणांचं धर्मांतर केल्याचं उघड झालंय. एका संस्थेच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं हे रॅकेट काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
विशेष म्हणजे अटक झालेला उमर गौतम यानं स्वतः धर्मांतर केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम फतेपूरचा राहणारा आहे. 1984 साली तो घरातून पळून गेला आणि त्यानं मुस्लीम धर्म स्वीकारला.
दुसरीकडे हा सगळा पाकिस्तानी गुप्तहेर संस्था, ISIचा कट असल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागलेत. याची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत, ते अधिक तपासानंतर उघड होईल. मात्र यामुळे पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर धर्मांतराचा मुद्दा ऐरणीवर आलाय.