बंगळुरुत पत्नी आणि सासरच्यांच्या छळाला कंटाळून एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी आत्महत्या केली आहे. अतुल सुभाष यांनी दीड तासाचा व्हिडीओ आणि 23 पानांची सुसाईड नोट आपल्या मागे सोडली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या चार वर्षाच्या मुलासाठी भावूक करणारा एक संदेश लिहिला आहे. यामध्ये त्यांनी जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हा तुझ्यासाठी आपला जीव देऊ शकतो असा विचार केला होता असं लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतुल सुभाष यांनी पत्रात लिहिलं आहे की, "जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हा तुझ्यासाठी आपला जीव देऊ शकतो असा विचार केला होता. पण दु:खाची बाब म्हणजे आज तुझ्यामुळे मला जीव द्यावा लागत आहे. जोपर्यंत मी तुझा फोटो पाहत नाही, तोपर्यंत मला तुझा चेहराही आठवत नाही. तेव्हा तू एक वर्षांचा होतास. मला आता तुझ्याबद्दल दु:खाशिवाय दुसरी कोणतीही भावना येत नाही. आता तू फक्त एक वस्तू झाला आहे, ज्याचा वापर करुन जास्तीत जास्त वसुली केली जाईल". 


पत्रात पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "यामुळे तुला दु:ख होईल, पण सत्य हेच आहे की आता मला तू माझ्याकडून झालेली चूक आहे असं वाटत आहे. ही व्यवस्था आपल्या मुलाला वडिलांवर ओझं आणि दायित्व बनवते हे फार वाईट आहे. मी कुटुंबापासून वेगळं राहणाऱ्या अनेक वडिलांना भेटलो आहे. यातील अनेकांच्या अशाच भावना असतात. काहीजण आपल्या मुलांना आयुष्याचा भाग बनवण्यासाठी प्रयत्न करताना रोज आतून मरत असतात. सिस्टम प्रत्येक पित्यासह असं करु इच्छित आहे. मी असं करत नाही आहे".


मुलासाठी अतुल सुभाष यांनी लिहिलं आहे की, "जोपर्यंत मी जिवंत आहे आणि पैसे कमावत आहे तोपर्यंत तुझे आजी, आजोबा, काका मला त्रास देण्यासाठी तुझा एका वस्तूप्रमाणे वापर करतील. मी त्यांना माझी आई, वडील आणि भावाला विनाकारण त्रास देताना पाहू शकत नाही. मी माझ्या वडिलांसाठी तुझ्यासारख्या 100 मुलांचं बलिदान देऊ शकतो आणि तुझ्यासाठी स्वत:चं एक हजार वेळा बलिदान देऊ शकतो. पण मी आपल्या वडिलांच्या छळाचं कारण ठरणार नाही. तुला कधी बाप काय असतो हे समजेल का मला शंका आहे, मात्र मला वडील काय असतात हे चांगलंच माहिती आहे".


9 डिसेंबरला आत्महत्या


अतुल सुभाष यांनी 9 डिसेंबरला बंगळुरुमधील आपल्या बेडरुममध्ये पंख्याला लटकून गळफास घेतला. यावेळी त्यांनी घातलेल्या टी-शर्टवर न्याय प्रलंबित आहे असं लिहिलं होतं. आत्महत्येच्या आधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी सासरच्यांना आणि न्यायव्यवस्थेला जबाबदार ठरवलं. लग्नाच्या दोन वर्षानंतर पत्नीने त्यांच्यावर हुंड्यासाठी छळ, वडिलांच्या हत्या आणि अनैसर्गित लैंगिक शोषण असे एकूण 9 गुन्हे दाखल केले होते. प्रकरण मिटवण्यासाठी आपल्याकडे 3 कोटींची मागणी करण्यात आली असा त्यांचा आरोप आहे.