नवी दिल्ली - बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याचा एसएमएम मोबाईलवर आला तर कोणालाही आनंद होतो. पण जर बॅंक खात्यात एकदा नाही दोनदा १० ते २५ हजारांदरम्यानची रोकड येत असेल आणि ती कुठून येते आहे, हे समजतच नसेल, तर मात्र कोणीही गोंधळात पडू शकतो. अशीच काहीशी स्थिती पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील लोकांची झाली आहे. या जिल्ह्यातील काही लोकांच्या बॅंक खात्यांमध्ये एकदा नव्हे, दोनदा रक्कम जमा झाली आहे. ज्या नागरिकांचे युको बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया आणि स्टेट बॅंकेत खाते आहे, त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बर्धमान जिल्ह्यातील केतुग्राम नगर पंचायत समितीच्या शिबलून, बेलून, टोलाबाडी, सेनपाडा, अम्बालग्राम, नबग्राम आणि गंगाटीकुरी या ठिकाणच्या बॅंक खात्यामध्येच ही रक्कम जमा होते आहे. यासंदर्भात पत्रकारांनी बॅंक व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. खातेदारांच्या अकाऊंटमध्ये १० ते २५ हजारादरम्यान रक्कम येते आहे. पण ती कुठून येते आहे हे सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. खात्यात आलेले पैसे काढण्यासाठी गावकऱ्यांनी बॅंकेबाहेर रांग लावल्याचेही दिसते आहे. एनईएफटीच्या माध्यमातून हे पैसे ग्राहकांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात येते आहेत.


या संदर्भात केतुग्रामचे आमदार शेख शाहनवाज यांना विचारले असता त्यांनी हसत हसत सांगितले की, पंतप्रधानांनी पैसे येतील असे सांगितले होते. कदाचित हे तेच पैसे असतील. काही गाववालेही हे पैसे सरकारकडूनच दिले जात असल्याचे सांगत आहेत. असे अचानक एखाद्याच्या खात्यामध्ये पैसे कसे काय येतात, त्यामागे काय गौडबंगाल आहे, हे अद्याप प्रशासनालाही कळलेले नाही. याचा तपास सुरू असल्याचे कटवा उपविभागाचे अधिकारी सौमेन पल यांनी सांगितले.