Gallantry Awards: गलवान खोऱ्यात शहीद कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र प्रदान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात सैनिकांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले.
नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात (Galwan Valley) चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले कर्नल संतोष बाबू (col Santosh Babu) यांना आज महावीर चक्र (Mahavir chakra) प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath kovind) यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात सैनिकांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. कर्नल संतोष बाबू व्यतिरिक्त नायब सुभेदार नुदुराम सोरेन, हवालदार के पलानी, नाईक दीपक सिंग, शिपाई गुरतेज सिंग यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले.
कर्नल संतोष बाबूंसोबत हे जवानही गलवानमध्ये ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान शहीद झाले होते. 2020 मध्ये 15-16 जूनच्या मध्यरात्री चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 भारतीय जवान शहीद झाले होते, तर भारतीय जवानांनी अदम्य धैर्य दाखवून चिनी सैनिकांचे मोठे नुकसान केले होते.
दुसरीकडे 4 पॅरा स्पेशल फोर्सचे सुभेदार संजीव कुमार यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईदरम्यान ते शहीद झाले. अदम्य साहस दाखवत त्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले तर दोन जण जखमी झाले.