नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत दोन हात करताना शहीद झालेल्या सर्व वीरांचा यावर्षी प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्काराने होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार बिहार रेजिमेंटच्या गलवान चकमकीतल्या शूरवीर योद्ध्यांचा गौरव होण्याची शक्यता आहे. १५ जूनला गलवान व्हॅलीत चिनी घुसखोरांना १६ बिहारच्या शूरवीरांनी रोखलं होतं. यावेळी बटालियनचे कमांडींग ऑफिसर आपल्या १९ जवानांसह चीनच्या शेकडो जवानांना भिडले होते. या तुंबळ हाणामारीत कर्नल संतोष बाबूंसह भारताचे २० जवान शहीद झाले. त्याचसोबत चीनचे ३५ सैनिक मारले गेले. या शौर्याचा गौरव प्रजासत्ताक दिनी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रजासत्ताक दिनी बिहार बटालियनचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह भारतीय लष्कराच्या जवानांना मरणोत्तर शौर्य पदक दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या या वृत्ताला संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्य दलाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


गॅलवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्यासह झालेल्या हिंसक संघर्षात शहीद कर्नल संतोष बाबू हे भारताचे नेतृत्व करीत होते, परंतु रात्री उशिरा झालेल्या हिंसाचारात ते हुतात्मा झाले. चीनने फसवणूक करुन केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. पण या शूरवीरांना चीनी सैनिकांना पुढे येण्यापासून रोखले.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले होते की, आपल्या सैनिकांचे शौर्य आणि त्याग हा देश कधीही विसरणार नाही. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. देश त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. भारताच्या पराक्रमाच्या शौर्याचा आणि धाडसाचा आम्हाला अभिमान आहे.'