Ram Lalla Idol in Ravan Mandir: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरात हा क्षण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील अनेक भागात कलश यात्रा काढण्यात आल्या होत्या. मात्र, भारतातील असं एक गाव आहे जिथे आजपर्यंत फक्त रावणाचीच पूजा केली जात होती. मात्र, रामलल्लाच्या प्राणपतिष्ठा सोहळ्याच्या दरम्यानच या ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोएडा येथे असलेल्या एका ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदाच भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात फार पूर्वीपासून फक्त रावणाचीच पूजा करण्यात येत होती. मात्र, आता हा बदल करण्यात आला आहे. हे प्राचीन शिव मंदिर बिसरख गावमध्ये असून स्थानिक लोक या गावाला रावणाचे जन्मस्थान मानतात. 


शिवमंदिराचे मुख्य पुजारी महंत रामदास यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आज पहिल्यांदाच मंदिर परिसरात प्रभू श्रीराम यांच्यासोबतच माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची विधिवत पूजा करण्यात आली. या मंदिरात 40 वर्षांहून अधिक काळ सेवा देणाऱ्या या पुजाऱ्यांनी सांगितले की या मूर्त्या राजस्थानमधून आणण्यात आल्या आहेत. 


बिसरख गावाचा संदर्भ शिवपुराणात आढळतो. असं म्हणतात की याच गावात रावणाचा जन्म झाला आहे. तर, या गावाचे नाव विश्रवा ऋषींच्या नावावरुन पडले आहे. विश्रवा ऋषीनीच या गावात अष्टभुजी शिवलिंगाची स्थापना केली. आजही या गावातील स्थानिक नागरिक मोठ्या श्रद्धेने भगवान शंकराची पूजा केली जाते. 


स्थानिक गावकरी सांगतात की, या गावात रावणाचेही मंदिर आहे. गावकरी मोठ्या श्रद्धेने रावणाचे पूजन करतात. आजही या गावात रामलीलाचे आयोजन केले जात नाही. मात्र, आता या मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे व विधिवत पूजाही केली जाणार आहे. या मंदिराचे मुख्य पुजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात माता सीता आणि लक्ष्मण यांच्याही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. 


22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या वेळी देशातील अनेक दिग्गजांनी अयोध्येत हजेरी लावली. तर, कलाकार, खेळाडूदेखील या सोहळ्यात सामील झाले होते.