निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; 7 सेकंदांचा थरार कॅमेरात कैद
Viral Accident Video Bike Collision With Nilgai: बाजारामध्ये निघालेल्या या तरुणाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा सारा घटनाक्रम अवघ्या 7 सेकंदांमध्ये घडला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Viral Accident Video Bike Collision With Nilgai: उत्तर प्रदेशमधील अयोध्येत एक विचित्र अपघात घडला आहे. या अपघामध्ये एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. इनायत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मिथे गावानजिक झालेला विचित्र अपघात कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला निलगायीने धडक दिली. निलगायी रस्ता ओलांडत असताना तिच्या वाटेत हा दुचाकीस्वार आल्याने तिने दुचाकीला धडक दिली.
कोण होता हा तरुण?
समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुणाला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. निलगायीने या तरुणाला धडकल्याने तिचं शिंग या तरुणाच्या छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. मरण पावलेल्या तरुणाचं नाव मुकेश पांड्ये असं आहे. विजयी पाठक गावातील सुरेंद्र नाथ पांड्ये या शेतकऱ्याचा मुलगा अशलेला मुकेश इनायत नगरमधील बाजारपेठेत जात असताना हा अपघात झाला.
व्हिडीओत नेमकं काय दिसतंय?
व्हायरल व्हिडीओमध्ये मुकेश त्याच्या दुचाकीवरुन रस्त्याच्या अगदी डावीकडून जात असताना दिसत आहे. अचानक विरुद्ध लेनमधून डिव्हायडरवरुन निलगायी धावत रस्ता ओलांडण्यासाठी विरुद्ध बाजूला आली. या निलगायीने डिव्हायर ओलांडल्यानंतर पलिकडे जाण्यासाठी उड्या मारत धाव घेतली असता समोरुन येणाऱ्या मुकेशच्या बाईकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की मुकेश काही फुटांवर दूर जाऊन पडला. मुकेश डांबरी रस्त्यावरुन थेट बाहेर फेकला गेला.
7 सेकंदात घडला हा सारा प्रकार
संपूर्ण घटनाक्रम अवघ्या 7 सेकंदांमध्ये घडला. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी घडलेल्या या दुर्घटनेबद्दल खंत व्यक्त केली असून दुर्देवी तरुणाचा असा अंत होणे फारच हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे.
हल्ली बांधले जातात अंडरपास आणि ब्रीज
या व्हिडीओखाली अनेकांनी अशाप्रकारे भटक्या कुत्र्यांमुळेही दुचाकी स्वारांचे अपघात होतात असं म्हटलं आहे. मागील काही वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग बांधताना ते जंगली भागातून जात असतील तर त्या भागामध्ये अंडर पास किंवा विशेष वाइल्ड लाइफ ब्रीज उभारले जातात. या माध्यमातून प्राण्यांना रस्ता ओलांडायचा असेल तर तो सुरक्षितपणे ओलांडता येतो.