लखनऊ: अयोध्या खटल्याचा निकाल मुस्लिमांच्या बाजूने लागला तरी त्यांनी ही जागा हिंदूंना देऊन टाकली पाहिजे, असे मत अलीगढ विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीर उद्दीन शाह यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी लखनऊ येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अयोध्या खटल्यात पक्षकारांनी न्यायालयाबाहेर समझोता करावा, हे माझे ठाम मत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, न्यायालयाबाहेर यावर तोडगा न निघाल्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल द्यावा, तो पंचायती असू नये. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांच्या बाजूने निकाल दिलाच तरी अयोध्येत मशीद बांधणे शक्य आहे का? माझ्या मते हे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे न्यायालयाने मुस्लिमांच्या बाजूने निकाल दिला तरी देशातील शांतता टिकून राहण्यासाठी मुस्लिमांनी ती जमीन हिंदूंना देऊन टाकावी. या सगळ्यावर असाच तोडगा काढला पाहिजे, अन्यथा आपण कायम भांडतच बसू, असे जमीर उद्दीन शाह यांनी म्हटले. 


तब्बल ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्या खटल्याच्या सुनावणीला ६ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. रामलल्ला, निर्मोही आखाडा, अखिल भारतीय रामजन्मस्थान पुनरुत्थान समिती, हिंदू महासभेचे दोन गट, शिया वक्फ बोर्ड आणि गोपाल सिंग विशारद यांचे वारस हे या खटल्यातील पक्षकार आहेत. 


सर्वोच्च न्यायायलयाने सर्व पक्षकारांना येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत आपले युक्तिवाद पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता १४ ऑक्टोबरला मुस्लिम पक्षकारांकडून ज्येष्ठ वकील राजीव धवन बहस हे युक्तिवाद करतील. यानंतर १५ आणि १६ ऑक्टोबरला उर्वरित पक्षकार अंतिम युक्तिवाद करतील.