नवी दिल्ली : रामजन्मभूमी खटल्यात अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू असताना मुस्लिम पक्षकाराचे वकिल राजीव धवन यांनी हाय व्होल्टेज ड्रामा केला. हिंदू पक्षाचे वकील विकास सिंह यांनी काही नकाशे न्यायालयासमोर ठेवले. तसंच वादग्रस्त जमिनीवर मंदिर असल्याचा सिद्ध करण्यासाठी आयपीएस किशोर कुणाल यांच्या अयोध्या रिव्हिजिटेड या पुस्ताकाचा हवाला दिला, मात्र हा दावा राजीव धवन यांनी फेटाळून लावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर विकास सिंह यांनी त्यांच्यासमोर नकाशा ठेवला असता धवन यांनी तो फाडून टाकला. त्यावर सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशीच परिस्थिती राहिली तर आता सुनावणी संपल्याचं जाहीर करून लेखी स्वरूपात युक्तीवाद घेणार असल्याची तंबी दिली.


त्याआधी या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला आहे. त्यामुळे  सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवलं आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलं आहे.


दरम्यान या खटल्याची रोज सुरू असलेली सुनावणी आजच ५ वाजेपर्यंत पूर्ण करणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयात एका वकिलाने आणखी वेळ मागितला असताना न्यायालयाने इनफ इज इनफ असं सुनावलं.