अयोध्येतील राम जन्मभूमी - बाबरी मशिद खटल्याची आजपासून सुनावणी
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याची सुनावणी आजपासून सुरु होणार आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद खटल्याची सुनावणी आजपासून सुरु होणार आहे.
'निवडणुका झाल्यानंतर सुनावणी घ्या'
या प्रकरणाच्या याआधीच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या प्रकरणाची सुनावणी टाळण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान ५ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी सध्याचे वातावरण चांगले नसल्याने २०१९सालच्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जुलै महिन्यात सुनावणी घ्यावी, असे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी याचिकेत म्हटले होते.
खंडपीठाकडून गंभीर दखल
त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली. ३० सप्टेंबर २०१० रोजी म्हणजे मूळ खटला दाखल झाल्यापासून तब्बल १२५ वर्षांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिला.
आधीचा निकाल मान्य नाही!
यानुसार वादग्रस्त जागेपैकी दोन तृतीयांश जागा हिंदूंना आणि एक तृतीयांश जागा मुस्लिमांना अशी वाटणी करण्यात आली. हा निकाल दोन्ही पक्षांना मान्य नव्हता. मे २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली.