अमित राजपूत, झी २४ तास, अहमदाबाद-अयोध्या : अयोध्येतल्या राम मंदिराचा मार्ग सुप्रीम कोर्टानं मोकळा केलाय. अयोध्येतलं हे राममंदिर उभारण्याची तयारीही झालीय. नेमकं हे मंदिर कसं असेल? कसा आहे या मंदिराचा आराखडा? अयोध्येत रामंदिर कसं उभारलं जाणार? याची उत्सुकता अनेकांना आहे. राम मंदिर उभारणीचे आदेश सुप्रीम कोर्टानं आता दिले असले तरी राम मंदिराचा आराखडा १९७८ मध्येच तयार झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐतिहासिक मंदिरं बांधण्यासाठी तज्ज्ञ असलेल्या चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी राममंदिराच्या उभारणीचा आराखडा तयार केलाय. १९७८ साली विश्व हिंदू परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या निर्देशानं चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी मंदिराचा आराखडा तयार केला.


भारतात मंदिरांची उभारणी चौकोनी स्वरुपात असते. पण प्रस्तावित मंदिर अष्टकोनी आहे. 'नागाशैली'त या मंदिराची उभारणी केली जाणार आहे. या मंदिराची लांबी २७५ फूट असणार आहे. रुंदी १३५ फूट आणि उंची १४१ फूट असणार आहे. हे मंदिर दोन मजली असणार आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर रामलल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. म्हणजेच रामाचे जन्मस्थान या भागात असणार आहे. तर मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर भव्य रामदरबाराची उभारणी केली जाणार आहे. 


या मंदिराची शिवशास्त्रानुसार गर्भगृह, मंडप, चौकी आणि पायऱ्या अशी मांडणी असणार आहे. मंदिराचा आराखडा तयार करण्यासाठी सहा महिने लागल्याचं चंद्रकांतभाई सोमपुरा यांनी सांगितलं.


मंदिरासाठी गुलाबी रंगाच्या दगडाचा वापर करण्यात येणार आहे. हा दगड राजस्थानातील भरतपूरच्या बन्सी पहाडपूरमधून आणण्यात आलाय.


गुजरातच्या सोमनाथ मंदिराची जशी उभारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. मंदिर अतिभव्य असेल याची दक्षता घेण्यात आलीय. अर्थातच, डोळ्याचं पारणं फिटेल असं हे मंदिर असेल यात शंका नाही.