Ayodhya Mosque: अयोध्येत उभारणार ताजपेक्षाही भव्यदिव्य मशीद; महाराष्ट्रातील BJP नेत्यावर जबाबदारी
Ayodhya Mosque: महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर या मशिदीच्या उभारणीसंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मशिदीचं बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.
Ayodhya Mosque: अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठीची जय्यत तयारी मागील काही आठवड्यांपासून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच हजारो अती महत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर फार मोठ्याप्रमाणात तयारी सुरु आहे. या सोहळ्याची चर्चा असतानाच आता अयोध्येमधून अजून एक बातमी समोर येत आहे. अयोध्येत ताजमहलापेक्षाही मोठ्या आकाराची भव्यदिव्य मशीद उभारली जाणार आहे.
कुठे उभारलं जाणार हे मशीद?
अयोध्येपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या धन्नीपूरमध्ये ही भव्य मशीद उभारली जाणार आहे. फेब्रवारी 2020 मध्ये ही मशीद उभारण्यासाठी 5 एकरांचा भूखंड देण्यात आला होता. या मशीदीचं नाव मोहम्मद बिन अब्दुल्ला असं असणार आहे. भारतातील सर्वात मोठ्या आकाराच्या मशिदींपैकी ही एक असणार आहे. अयोध्येमधील या मशिदीमध्ये जगातील सर्वात मोठ्या आकाराचे म्हणजेच 21 फूटांचे कुराण उभारण्यात येणार आहे. पाच मिनार असलेली ही भारतामधील पहिलीच मशीद असणार आहे. 2024 च्या रमजाननंतर म्हणजेच यावर्षीच्या उत्तरार्धामध्ये मशिदीचे बांधकाम सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ताजपेक्षाही सरस
रामजन्मभूमी वादातील मुस्लीम पक्षाने देशातील सर्वात मोठी मशीद उभारण्याची तयारी सुरु केली आहे. इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनकडे (आयआयसीएफ) या भव्य मशिदीच्या उभारणीच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही मशीद सौंदर्याच्याबाबतीत अगदी ताज महालपेक्षाही सरस असेल असा विश्वास फाऊंडेशनला वाटत आहे.
राम मंदिराकडून प्रेरणा
राम मंदिराच्या यशाने प्रेरणा घेऊन आयआयसीएफ या मशिदीसाठी नव्याने आर्थिक मदत गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे. या मशिदीसाठी पैसे गोळा करण्याची जबाबदारी महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीचे नेते हाजी अरफात शेख यांच्याकडे आहे. शेख यांना नोव्हेंबर 2023 मध्ये मशिदीच्या निर्मितीसाठीच्या समितीच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं. या मशिदीचं सुरुवातीचं डिझाइन दिल्लीतील जामिया मिलिया इश्लामिया विद्यापिठाच्या आर्किटेक्टर विभागाचे संस्थापक डीन एस. एम. अख्तर यांनी तयार केलं होतं. अख्तर यांनी तयार केलेल्या डिझाइननुसार 4500 स्वेअर मीटरमध्ये ही मशीद उभारली जाणार आहे. यामध्ये एक रुग्णालय, कम्युनिटी किचन, लायब्रेरी आणि रिसर्च सेंटर उभारलं जाणार आहे. आधीच्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय आयआयसीएफने घेतला आहे. आता जगातील आठवं आश्चर्य वाटावं असं मशीद उभारण्याचा समितीचा मानस आहे.
वॉटर-लाइट शो
या मशिदीमध्ये एक विशेष वॉटर आणि लाइट शो सुद्धा असणार आहे. अजानच्या वेळेस आवाजाप्रमाणे पाण्याची कारंजी आणि लाईट्सचा शो आयोजित केला जाईल. अयोध्येमध्ये सरयू नदीच्या घाटावर उत्तर प्रदेश सरकारने तयार केलेल्या लाइट अॅण्ड वॉटर शोपासून प्रेरणा घेऊन हा शो थयार केला जाणार आहे.