Ayodhya Ram Mandir: अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये तिसऱ्या आठवड्यात केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मंदिरामध्ये दर्शनाला सुरुवात झाल्यानंतरही रामभक्तांना अगदी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला हात लावता येणार नाही. अयोध्येमधील राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गर्भगृहामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. अंदाजे 35 फूट अंतरावरुन लोकांना दर्शन घेता येणार आहे.


फक्त या 2 व्यक्तींना मिळणार प्रवेश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने या मंदिराच्या व्यवस्थापनाचं काम पाहिलं जाणार आहे. याच ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, गर्भगृहाचे पावित्र्य राखण्यासाठी भक्तांना लांबूनच दर्शन घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार फक्त राजा आणि मंदिराच्या पुजाऱ्यांना असतो, असं हिंदू धार्मिक मान्यता सांगतात. हीच परंपरा लक्षात घेऊन फक्त पंतप्रधान आणि पुजाऱ्यांनाच गर्भगृहामध्येच प्रवेश देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.



पुजाऱ्यांना दिल्या जाणार सरकारी सुविधा


राम मंदिरामध्ये पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जातात तशा सुविधा दिल्या जाणार आहेत. रामजन्मभूमीचे मुख्य आर्किटेक्ट आचार्य सत्येंद्र दास यांनी यासंदर्भात माहिती दिली. ट्रस्टकडून रामलल्लाच्या सेवेतील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी स्तरावरील सुविधा पुरवणार आहे, असं दास म्हणाले. पुजाऱ्यांच्या निवासाची आणि वैद्यकीय सुविधांबरोबर निवासी भत्ताही या पुजाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.



1800 कोटी रुपयांचा खर्च होणार


मागील अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या अयोध्येतील बाबरी मशिद-रामजन्मभूमी वादावर सुप्रीम कोर्टाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं निर्माण करण्यात यावं, तसेच मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात यावी, असं कोर्टाने आपल्या निकालपत्रात म्हटलेलं. त्यानंतर राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू झालं असून हे काम आता पुढील काही महिन्यांध्ये पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. राम मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे 1800 कोटी रुपयांचा खर्च येईल, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी 2020 साली सप्टेंबर महिन्यामध्ये दिली होती.