200 किलो वजन, 51 इंच उंची, जाणून घ्या रामलल्लाच्या मूर्तीची 9 वैशिष्ट्यं
Ram Mandir Pran Pratishtha : ज्या क्षणाची संपूर्ण देश वाट बघतोय, तो क्षण आता जवळ आलाय. प्रभू श्रीरामची मूर्ती अयोध्येतल्या राममंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यात आलीय. येत्या 22 तारखेला रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे.
Ram Lala Idol Specifications : येत्या 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) केली जाणार आहे. संपूर्ण देशभरात हा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार आहे. गर्भगृहात रामलल्लाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली असून या मुर्तीची पहिली झलक समोर आली आहे. प्रभू श्रीरामाचं बालरुप डोळे दिपवणारं आहे. गणेश पूजनानं आजच्या विधीची सुरुवात झाली. मंदिरात यज्ञयाग करण्यात आला. त्यासाठी अरणिमन्थनातून अग्नि प्रकट करण्यात आला. द्वारपालांकडून सर्व शाखांचं वेदपारायण, देवप्रबोधन, औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास, कुण्डपूजन, पश्चभूसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अरणिमन्थनाद्वारे प्रकट झालेल्या अग्नीची यज्ञकुंडात स्थापना झाली.
रामलल्लाच्या मुर्तीची वैशिष्ट्य
- रामलल्लाची ही मूर्ती हजारो वर्ष तशीच राहिल, पाणी प्रतिरोधक आहे.
- या मूर्तीची चमक वर्षानुवर्ष टिकणारी आहे.
- पायाच्या बोटापासून कपाळापर्यंत 51 इंच मूर्तीची उंची आहे.
- रामलल्लाच्या मूर्तीचं वजन जवळपास 200 किलो इतकं आहे.
- रामलल्लाच्या डोक्यावर मुकूट आणि आभामंडल आहे
- श्रीरामाचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत.
- भव्य कपाळ आणि मोठे डोळे हे मुर्तीचं वैशिष्ट्य आहे.
- कमळाच्या फुलावर उभी असलेली मूर्ती, हातात धनुष्यबाण
- मूर्तीत पाच वर्षाच्या मुलाची बालसुलभ कोमलता.
कशी आहे रामलल्लाची मूर्ती
म्हैसूर येथील प्रख्यात मूर्तीकार अरुण योगीराज यांनी रामलल्लाची ही मूर्ती घडवली आहे. 51 इंचांची ही मूर्ती काळ्या शाळिग्राम शिळेपासून बनवण्यात आली आहे. श्री रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यातपूर्वी विधी आणि पूजा करण्यात आल्या. काशीहून आलेल्या विद्वानांनी कार्यक्रम संपन्न केला. 121 आचार्यांनी विधीप्रमाणे पूजा केली. 200 किलो वजनाच्या रामललाच्या मूर्तीचा जलाभिषेक करून गर्भगृहात स्थापना करण्यात आली.
विधीवत प्राणप्रतिष्ठा
मिळालेल्या माहितीनुसार सर्वात आधी रामलल्लासमोर आरसा धरण्यात येईल, प्रभू श्रीराम स्वत:चा चेहरा पाहितील. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत पाच जण उपस्थित असतील. 22 जानेवारीला पीएम मोदी यांच्या हस्ते शुभ मुहुर्तावर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाईल. अयोध्या रामाचं जन्मस्थळ असल्याने प्रभू श्रीरामाची बालमूर्ती असावी असं रामभक्तांचं म्हणणं होतं. हे बालरुप पाहिल्यानंतर महिलांमध्ये मातृत्व भावना निर्माण होईल असं मंदिराच्या विश्वस्तांचं म्हणणं होतं.