भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली खेळताना दिसणार नाही. वैयक्तिक कारण सांगत त्याने विश्रांती घेतली आहे. दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अयोध्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. तिथेही दोघे गैरहजर होते. पण यानंतर अयोध्येच्या रस्त्यावर रात्री विराट कोहलीला चाहत्यांनी घेरल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण हा विराट कोहली नव्हता तर त्याच्यासारखा दिसणारा तरुण होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसणारा एक तरुण दिसताच लोकांनी त्याला घेरलं होतं. भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून विराटच्या लूकमध्ये उतरलेल्या तरुणाला पाहिल्यानंतर अनेकांचा तो खरा विराट असल्याचा गैरसमज झाला. यानंतर काय लोकांनी त्याच्या बाजूला एकच गर्दी केली आणि फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली. एका सेल्फीसाठी गर्दी त्याचा पाठलाग करत होती. यानंतर त्या तरुणाचीही भंबेरी उडालेली दिसत होती. तो लांब जाण्याचा प्रयत्न करत असताना लोक मात्र काही त्याचा पिच्छा सोडत नव्हते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


दरम्यान विराट कोहलीने बीसीसीआयला पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आपण उपलब्ध नसू असं कळवलं आहे. त्याची उपस्थिती आणि संपूर्ण लक्ष आवश्यक असल्याने खासगी कारणास्तव त्याने विश्रांती घेतली असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. दरम्यान बीसीसीआयने क्रिकेटचाहते आणि प्रसारमाध्यमांना यासंबंधी चुकीचं वृत्त देऊ नये असं आवाहन केलं आहे.  25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने लवकरच आपण विराटच्या जागी खेळणाऱ्या दुसऱ्या खेळाडूचं नाव जाहीर करु असं सांगितलं आहे. 



"विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून वैयक्तिक कारणांमुळे नाव वगळण्याची विनंती केली आहे," अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी यासंबंधी चर्चा झाल्याचंही बीसीसीआयने सांगितलं आहे. 


"विराटने कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली असून, देशासाठी खेळणं आपली नेहमीच प्राथमिकता असल्याचं सांगितलं आहे. पण काही वैयक्तित परिस्थितीत त्याची उपस्थिती आणि संपूर्ण लक्ष आवश्यक आहे," अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. जय शाह यांनी बीसीसीआयचा विराटवर पूर्ण विश्वास असल्याचं स्पष्ट केलं आहे. 


जय शाह यांनी विराट कोहलीच्या गोपनीयतेचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. "बीसीसीआय मीडिया आणि चाहत्यांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची आणि कोणत्याही अफवा न पसरवण्याची विनंती करत आहे," असं ते म्हणाले आहेत.