अयोध्येतील राम मंदिरच्या पूजाऱ्यांना मोठी भेट, 6 महिन्यात दुसऱ्यांदा वेतनवाढ
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी व सहाय्यक पुजाऱ्यांच्या वेतनात गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
Ayodhya Ram Mandir: उत्तर प्रदेश येथे निर्माण होत असलेल्या राम मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच राम लल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत. त्या अगोदरच रामलल्लाच्या सेवकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अयोध्येतील पुजाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. गेल्या सहि महिन्यात त्यांच्या पगारात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. श्रीराम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पूजाऱ्यांना 25 हजार रुपये पगार मिळत होता. मात्र आता मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या पगार 32,900 रुपये करण्यात आला आहे. त्यांच्यासोबतच मंदिराचे 4 सहाय्यक पुजाऱ्यांचे वेतन वाढवण्यात आलं आहे.
दुप्पट झाला पगार
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या आधी राम मंदिराच्या मुख्य पुजारी आणि सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार खूपच कमी होता. त्यावेळी मुख्य पुजाऱ्यांना 15520 रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्यांना 8940 रुपयांचा पगार मिळत होता. वाढती महागाई पाहता मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पगार वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार राम मंदिर ट्रस्टने मे महिन्यात पहिल्यांदा पगार वाढवला होता. मुख्य पुजाऱ्यांचा पगार 25 हजार रुपये आणि सहाय्यक पुजाऱ्यांना 20000 रुपये पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच आता ऑक्टोबरमहिन्यात पुन्हा एकदा पगार वाढवण्यात आला आहे. मुख्य पुजाऱ्यांचा पगार 25 हजारांनी वाढून 32,900 करण्यात आला आहे तर त्यांच्या सहाय्यक पुजाऱ्यांचा पगार 31000 करण्यात आला आहे.
अयोध्येत तीन मजली राम मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे. मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असून 22 जानेवारी रोजी रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्यात येतणार आहे. मात्र, तिसऱ्या मजल्यासोबतच मंदिरावरील 161 फूट उंच कळसाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत तयार होणार आहे. ज्यावर भगवा फडकवण्यात येईल. मंदिराचे पूर्ण बांधकाम जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे.
राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रण देण्यात येणार आहे. त्यांच्याबरोबर देशभरातील तब्बल 10,000 दिग्गज व्यक्तीदेखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा सूर्यात झाल्यानंतर देशभरातील नागरिकांनी आपल्या घरासमोर पाच दिवे लावावे, असं अवाहन ट्रस्टने केले आहे.