अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राम मंदिर निर्माणासाठी साधुसंतांनी पुन्हा एकदा आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच यासंदर्भात एक बैठक होणार असून यामध्ये साधारण शंभरहून अधिक साधू-संत आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सहभागी असतील. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी आज मणि रामदास यांच्या छावणीत संतांची बैठक होणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे प्रांतिय प्रवक्ता शरद शर्मा यांनी सांगितले. रामजन्मभूमि न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठ होणार असून यामध्ये संत समाज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचेही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज होणाऱ्या बैठकीत अयोध्येतील साधुसंतांसोबत विहिपचे नेता सहभागी होतील. याप्रकरणी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत आतापर्यंत काय झाले ? या विषयावर मुख्य चर्चा होणार आहे. रामजन्मभूमि न्यासचे वरिष्ठ सदस्य डॉ. रामविलास दास वेदांती, रामवल्लभ कुंजचे अधिकारी राजकुमार दास, देवेंद्र प्रसादाचार्य, रंगमहलचे महंत रामशरण दास, लक्ष्मणकिलाधिश महंत मैथिली शरण दास, महंत अवधेस दास देखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. 



विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय, केंद्रीय मंत्री राजेंद्र सिंहदेखील या बैठकीत सहभागी होतील. आता या सरकारला राम मंदिर निर्माणाचे आश्वासन पाळायला हवे असे द्वारका-शारदापीठ आणि ज्योतिषपीठचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.