Ayodhya Ram Mandir : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराबाबत मोठी उत्सुकता आहे. या मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच श्री राम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार आहे. आता अयोध्येतल्या राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे बांधकाम ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. मंदिर उभारण्याच्या समितीने याबद्दल माहिती दिली आहे.


जानेवारी 2024 मध्ये मोदींच्या हस्ते प्रतिष्ठापना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतल्या भव्य राम मंदिराचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राम मंदिर उभारणीचे काम जोरात सुरु आहे. तेव्हा श्री राम भक्तांची  शेकडो वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे.  राजस्थानमधल्या गुलाबी दगडापासून राम मंदिराचं गर्भगृह बनवलं जात आहे. मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृह, नृत्य मंडप, रंगमंडप असणार आहे. तर उत्तर आणि दक्षिण दिशेला कीर्तन मंडप बनविण्याचं काम जोरात सुरु आहे. जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाल भगवान रामाच्या मूर्तीची मूळ जागी प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही अयोध्येत प्रभू श्रीरामाची पूजा करण्यासाठी जाणार आहेत.



अयोध्येत राम  मंदिराचे आतापर्यंत सुमारे 50 टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे. गर्भगृहाच्या भिंतींचे काम पूर्ण झाले असून पहिल्या मजल्याचे बांधकाम ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. मंदिर उभारण्याच्या समितीने याबद्दल माहिती दिली आहे. विशेष दगडांनी  10 फूट उंचीचे दगडी खांब उभे करण्यात आले आहेत. आता गर्भगृहाच्या व्यासपीठाचे काम सुरु झाले आहे. यासोबतच खांब आणखी 10 फूट उंच करण्यात येत असून, त्यानंतर छत टाकण्यात येईल. 


100 कोटी हनुमान चालिसाचे पठण


राम मंदिराचे बांधकाम सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, असे रामजन्मभूमी येथील ट्रस्टच्या कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी म्हटले आहे. तसेच  राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, 14-15 जानेवारी 2024 रोजी रामललाला गर्भगृहात विराजमान केले जाईल. त्यांनी सांगितले की, रामललाच्या अभिषेकपूर्वी संपूर्ण देशात 100 कोटी हनुमान चालिसाचे पठण केले जाईल. राम मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. रामललाची मूर्ती बालपणीची असेल, रामलालांच्या मूर्तीची कलाकृती 7 एप्रिलला तयार होणार आहे. वयाच्या 4-5 व्या वर्षी रामललाची मूर्ती बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही रामाची मूर्ती उभी असेल, असे ते म्हणाले. 


मंदिरासाठी महाराष्ट्रातील सागवानी लाकूड



दरम्यान,  राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडाचा वापर केला जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील आलापल्लीच्या जंगलातील सागवान लाकडाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वनविकास महामंडळाला हे सागवान पुरवण्यासाठी श्रीराममंदिर ट्रस्टने विनंती केली. यानंतर आलापल्लीच्या जंगलातील उत्कृष्ट सागवान राममंदिरासाठी निवडले. यासाठी चंद्रपुरातून सागवान लाकडाची पहिली फेरी रवाना झाली.