11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन
अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. हे अनुष्ठान 11 दिवसांसाठी असणार आहे.
अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून विशेष 11 दिवसीय धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात पंचवटी येथून धार्मिक अनुष्ठानांना सुरुवात केली आहे. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या भावनांचा अनुभव आपण घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर व्रत पाळत असून जमिनीरवर झोपत आहेत. तसंच फक्त नारळपाणीचं सेवन करत आहेत.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सर्व भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देवाने त्यांना एक साधन म्हणून निवडलं असून हे लक्षात घेऊनच 11 दिवसांचा विशेष धार्मिक कार्यक्रम हाती घेत असल्याचं पंतप्रधान म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी 11 दिवस 'यम नियम'चे पालन करणार असून, धर्मग्रंथात दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
'यम नियम' योग, ध्यान आणि विविध पैलूंमध्ये शिस्त यासह अनेक कठोर उपाय सुचवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधीपासूनच यातील अनेक नियमांचं पालन करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सूर्योदयापूर्वीच्या शुभ काळात उठणे, ध्यान करणं आणि 'सात्विक' अन्न सेवन करणं अशा अनेक सवयी मोदींनी आधीपासूनच अवलंबल्या असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवस कठोर तपश्चर्येसह उपवास करण्याचा निर्णयही घेतला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शास्त्रात अभिषेक करण्यापूर्वी उपवास करण्याच्या नियमांसाठी मार्गदर्शक तत्त्वं देण्यात आली आहेत.
22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी बुधवारी रात्री अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली, अशी माहिती श्रीराम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. गुरुवारी गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना होणं अपेक्षित आहे.
22 जानेवारीसाठी सध्या जय्यत तयारी सुरु आहे. प्राणप्रतिष्ठेआधी अनेक विधी केले जात असून, ते कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येपर्यंत चालू राहतील. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील, ज्यात अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटनही होणार आहे. मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या सोहळ्याला राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योगपती, संतांसह 7000 हून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत.