लखनऊ: सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या बाजूने कौल दिल्यानंतर आता लवकरच याठिकाणी मंदिर निर्माणाच्या कार्याला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. ही सगळी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे येत्या रामनवमीला राम मंदिर निर्माणाच्या कार्याला प्रारंभ होईल, अशी माहिती श्री राम जन्मभूमी न्यासचे वरिष्ठ सदस्य आणि मणिराम दास छावणीचे महंत कमल नयन दास यांनी दिली. विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) प्रस्तावित केलेल्या मॉडेलवरून मंदिराची निर्मिती होईल, असेही कमल नयन दास यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिर ट्रस्ट बनवण्याच्या निर्णयाचं राज ठाकरेंकडून स्वागत


काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राम मंदिराच्या निर्माणासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली होती. 'राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' असे या ट्रस्टचे नाव असेल. राम मंदिर ट्रस्टमध्ये दलित समाजातील एका व्यक्तिसह १५ सदस्य असतील. यापैकी ९ जण कायमस्वरुपी आणि ६ नामनिर्देशित सदस्य असतील. 


सुरुवातीच्या काळात हे विश्वस्त मंडळ ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरण यांच्या घरामधूनच काम करणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण विश्वस्त मंडळात असतील. या विश्वस्त मंडळात जगतगुरू शंकराचार्य, जगतगुरू माधवानंद स्वामी, युगपुरुष परमानंदजी महाराज यांचाही समावेश आहे. याशिवाय, पुण्याचे गोविंददेव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास यांचाही ट्रस्टच्या सदस्यांमध्ये समावेश आहे.