10 Crore Reward For Beheading CM Son: देशामध्ये मागील काही दिवसांपासून सनातन धर्माच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांशी करत उदयनिधी स्टॅलिन यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. मलेरिया आणि डेंग्यूसारखे सनातन धर्माचे वर्णन करून त्याला विरोध करू नये, तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असं उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम असून यापुढेही आपण हीच भूमिका कायम ठेऊ असं या वादानंतर उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. उदयनिधी यांच्या या विधानावरुन आता अयोध्येतील एका महंतांनी उदयनिधी यांना जीवे मारणाऱ्याला 10 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये उदयनिधी स्टॅलिन सहभागी झाले होते. या परिषदेशी संबंधित एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर उदयनिधी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये उदयनिधी हे सनातन धर्म नष्ट करण्याबाबत बोलत असल्याचं दिसत आहे. सनातन धर्माला केवळ विरोध करू नये. त्यापेक्षा तो संपवून टाकला पाहिजे,  असे त्यांनी या ठिकाणी केलेल्या भाषणात म्हटलं. यावरुनच आता उदयनिधी यांच्यावर टीका होत असून भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं आहे. 


10 कोटी कमी पडत असतील तर...


अयोध्या श्री परमहंस आचार्य यांनी उदयनिधींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उदयनिधी यांना जीवे मारणाऱ्याला मी 10 कोटी रुपये देईन असं आचार्य यांनी म्हटलं आहे. "उदयनिधीचा शिरच्छेद करण्यासाठी जर 10 कोटी रुपये कमी पडत असतील तर मी बक्षिसाची रक्कम वाढवण्यास तयार आहे. मात्र सतानत धर्माचा अपमान मी सहन करणार नाही. देशामध्ये जी काही प्रगती झाली आहे ती सनातन धर्मामुळे झाली आहे. त्याने त्याच्या विधानासाठी माफी मागितली पाहिजे. त्याने देशातील 100 कोटी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत," असं आचार्य यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.



उदयनिधी स्टॅलिन यांनी काय म्हटलेलं?


"मला भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल मी या परिषदेच्या आयोजकांचे आभार मानतो. तुम्ही संमेलनाला 'सनातन विरोधी संमेलन' ऐवजी 'सनातन निर्मूलन परिषद' असे नाव दिले आहे, त्याचे मला कौतुक वाटते. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या संवपून टाकल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही, त्याचा नायनाट करायचा आहे. त्याचप्रमाणे सनातनला विरोध करून संपवायचे आहे. सनातन हे नाव संस्कृतमधून आले आहे आणि त्याचा अर्थ स्थिर आणि अपरिवर्तित असा आहे. सर्व काही बदलावे लागेल. पण हे सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे," असे उदयनिधी स्टॅलिन यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.



टीकेनंतरही भूमिकेवर ठाम


सोशल मीडियावर विरोध असल्याचे पाहून उदयनिधी यांनी त्यांच्या एक्सवरुन (पूर्वीचे ट्विटर) प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे, असे स्टॅलिन म्हणाले. "आम्ही अशा सामान्य भगव्या धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही पेरियार, अण्णा आणि कलैगनार यांचे अनुयायी आहोत. सामाजिक न्याय राखण्यासाठी आणि समतावादी समाजाची स्थापना करण्यासाठी नेहमीच लढा देऊ. मी आज, उद्या आणि सदैव हेच सांगेन, द्राविड भूमीतून सनातन धर्म बंद करण्याचा आपला संकल्प थोडाही कमी होणार नाही," असे उदयनिधी म्हणाले.