अयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरण: चौघांना जन्मठेप तर एकाची निर्दोष सुटका
२००५ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने दिला निकाल.
अयोध्या : रामजन्मभूमी परिसरात २००५ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे. विशेष न्यायालयाने यात ४ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एकाची पुराव्याभावी निर्दोष सुटका केली आहे.
पुराव्यां अभावी सुटका झालेल्याचं नाव मोहम्मद अजीज आहे. तर उर्वरित चार जणांना जन्मठेपीची शिक्षा झाली. डॉ. इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नफीस, आसिफ इकबाल उर्फ फारूक यांना जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच या चौघांना 40 हजार रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे.
याप्रकरणाच्या सुनावणीसाठी सुरक्षेच्या मुद्द्यावरुन प्रयागराजच्या नेनी सेंट्रल कारागृहामध्येच विशेष न्यायालयामध्ये स्थापन करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश दिनेश चंद्र करत होते.
या संपूर्ण प्रकरणी एकूण ६३ साक्षीदारांची साक्षीची नोंद करण्यात आली होती. या ६३ जणांपैकी १४ जण हे पोलीस दलातील होते. अयोध्या दहशतवादी प्रकरणातील मुख्य म्होरक्या अरशदला त्याच ठिकाणी मारले गेले होते. ५ जुलै २००५ साली हा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये २ नागरिकांचा जीव गेला होता, तर काही सुरक्षा दलातील काही जवानांचा देखील मृत्यू झाला होता.
या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी १४ वर्षांपासून सुरु होती. जवळपास १४ वर्ष सुरु असलेल्या या प्रकरणाचा अंतिम निकालाची तारीख ठरली. १८ जूनला या प्रकरणी निकाल देण्याचे ठरले. चौकशीदरम्यान पोलिसांनी कट रचल्या प्रकरणी, दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरुन काही जणांना अटक केली होती. ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता, त्या दहशतवाद्यांना तेव्हाच मारले होते.
या १४ वर्षांच्या काळादरम्यान व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे देखील सुनावणी घेण्यात आली. हा हल्ला झाला तेव्हा रामजन्मभूमी-बाबरी मशीदच्या भागात तगडा बंदोबस्त होता. परंतु लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्यांनी या ठिकाणाला टार्गेट केले.
हे सर्व दहशतवादी नेपाळ मार्गे भारतात आले होते. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांनी या दहशतवाद्यांना तासाभराच्या आत मारुन पाडले. त्यामुळे मोठा हल्ला घडण्यापासून वाचला होता.
या दहशतवाद्यांनी अयोध्येत भाविकाच्या रुपात शिरकाव केला होता. संपूर्ण भागाची रेकी यांनी गाडीतून फिरुन केली होती. हल्ला करण्याआधी दहशतवाद्यांनी राम मंदिराचे दर्शन घेतले होते. गाडीतून हे सर्व दहशतवादी रामजन्मभूमी परिसरात आले. त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेला भेदून त्यांनी ग्रेनेड फेकून हा हल्ला केला होता.