अयोध्या निकाल : गृहमंत्रालयाचे राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे निर्देश
अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिलेत.
मुंबई : अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिलेत. मंत्रालयानं सर्वच महत्त्वाच्या राज्यांना एक पत्र पाठावलंय. यामध्ये राज्यातील सुरक्षा वाढवण्यास सांगितलंय. गरज असेल तर संवेदलशील ठिकाणी अधिक सुरक्षा पुरवण्यात यावी, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
अयोध्या खटल्याचा निकाल हा आता कधीही येऊ शकतो, त्यामुळे केंद्राकडून उपाययोजना सुरु झाल्या आहेत. अयोध्या प्रकरणाचा निकाल हा ५ दिवसांमध्ये कधीही येऊ शकतो. उद्या म्हणजेच शुक्रवारनंतर शनिवार आणि रवीवार न्यायालयाचं कामकाज बंद असेल. यानंतर मंगळवारी १२ तारखेला गुरु नानक जयंतीमुळेही न्यायालयाला सुट्टी असेल. १८ नोव्हेंबर म्हणजेच सोमवारपासून शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदाची सूत्र स्वीकारणार आहेत.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या कार्यकाळात ८ नोव्हेंबर, ११ नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १४ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबर या ५ दिवसांमध्येच न्यायालयाचं कामकाज सुरु असेल, त्यामुळे या ५ दिवसांमध्येच अयोध्या खटल्याचा निकाल येईल.
दरम्यान अयोध्या प्रकरणावर कोणत्याही मंत्र्याने काहीही विधान करु नये, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. देशात शांततेचं वातावरण कायम ठेवण्याचं आवाहन यावेळी मोदींनी केलं आहे.
राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. गेल्या ४० दिवसात या प्रकरणात जलद सुनावणी झाली. १६ ऑक्टोबरला या प्रकरणाचा निकाल सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
देशातील विविध मुस्लीम तसेच हिंदू संघटनांकडून सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो येईल त्याचं स्वागत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. ठीकठिकाणी बैठका घेऊन संघटनांच्या प्रमुखांना शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) देखील सुप्रीम कोर्टाचा जो ही निर्णय येईल त्याचं खुल्या मनानं स्वागत करण्याचं आवाहन केलं होतं. लवकरच अयोध्या प्रकरणात निर्णय़ येण्याची शक्यता आहे.