Ayodhya Weather Update : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी कसं असेल हवामान? IMD कडून महत्त्वाचा इशारा
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागानं दिलीये अतिशय महत्त्वाची माहिती.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येनगरीचं नाव सध्याच्या घडीला संपूर्ण जगात वाऱ्याच्या वेगानं पसरलं असून, या नगरीचं स्थान थेट अवकाशातूनही टीपण्यात आलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे अयोध्येत उभं राहिलेलं राम मंदिर आणि तिथं पार पडणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा. राम मंदिरातील या बहुप्रतिक्षित सोहळ्याच्या निमित्तानं भारतासह जगभरातील अनेकांची उपस्थिती अयोध्येमध्ये असून, यादरम्यान हवामानानंही सुरेख रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे.
कसं असेल अयोध्येतील हवामान?
अयोध्येतील सध्याचं वातावरण पाहता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज वर्तवत महत्त्वाची माहितीसुद्धा देण्यात आली आहे. IMD च्या वृत्तानुसार संपूर्ण उत्तर भारतात शीतलहरीचा प्रभाव अधिक परिणामकारकपणे पाहता येईल. अयोध्येमध्येसुद्धा कडाक्याची थंडी पडणार आहे.
हेसुद्धा वाचा : Ram Mandir Inauguration LIVE : आरंभी वंदीन अयोध्येचा राजा! रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अवघ्या काही क्षणांत
हवामान विभागाच्या माहितीनुसार अयोध्येमध्ये थंडीचा कडाका वाढणार असून, शहरातील किमान तापमान 8 अंश आणि कमाल तापमान 21 अंश सेल्शिअस राहण्याची शक्यता आहे. दाट धुक्याची चादर आणि थंडीचा कडाका असा दुहेरी मारा होणार असल्यामुळं अयोध्येतील जनजीवन विस्कळीत होणार आहे. पण, राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या जल्लोषापुढं हवामानाचा माराही फिका पडणार आहे. प्राथमिक माहितीनुसार अयोध्या आणि नजीकच्या भागावरील हवामानाची एकंदर प्रणाली पाहता इथं थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार सकाळी 5.30 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान अयोध्येमध्ये तापमान 8 ते 11 अंशांदरम्यान असेल. या वेळेत गार वारे मात्र गारठा आणखी वाढवतील. 11.30 वाजल्यापासून थंडीचं प्रमाण काहीसं कमी होऊन किमान तापमान 18 अंशांवर पोहोचेल. तर, दुपारनंतर तापमान पुन्हा एकदा कमी होण्यास सुरुवात होणार आहे.