Crime News : ग्रेटर नोएडाच्या (Greater Noida) एका मोठ्या खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकलीला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आलीय. यानंतर मुलीच्या वडिलांनी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जास्त प्रमाणात अ‍ॅनास्थिशिया (anesthesia) दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यामुळे तपासात सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ग्रेटर नोएडाच्या  एडब्लूएचओ हाउसिंग सोसायटीमध्ये तक्रारदार राहायला आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराच्या मुलीला खेळताना नाकाला लागले होते. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या संशयास्पद मृत्यूने तिच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.


शस्त्रक्रियेदरम्यान मुलीला हृदयविकाराचा झटका


मुलीला नाकाच्या शस्त्रक्रियेदरम्यान जास्त प्रमाणात अ‍ॅनास्थिशिया दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. "डॉक्टरांनी आम्हाला नाकावरील जखमेच्या खुणा घालवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर डॉक्टर मुलीला शस्त्रक्रियेसाठी घेऊन गेले. आम्ही पाहिले तेव्हा ती बेशुद्ध होती. बराच वेळ तिला शुद्ध न आल्याने डॉक्टरांनी तिला अतिदक्षता (ICU) विभागात हलवलं. यानंतर डॉक्टरांनी तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. त्यातच तिचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. पण रुग्णालयातील जाणकारांनी आम्हाला सांगितले की, शस्त्रक्रियेदरम्यान अ‍ॅनास्थिशिया अतिप्रमाणात दिल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला," असे तिच्या वडिलांनी सांगितले.


बेशुद्ध झाल्यानंतर ती उठलीच नाही


"शस्त्रक्रियेआधी मुलगी अगदी व्यवस्थित होती. ती हसत खेळत होती. पण शस्त्रक्रियेसाठी बेशुद्ध केल्यानंतर ती उठलीच नाही. मी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ती हालचाल करत नसल्याचे वारंवार सांगितले. मात्र त्यांनी शस्त्रक्रियेनंतर सगळं ठीक होईल असं सांगितले. पण शस्त्रक्रियेनंतर बेशुद्ध असलेल्या मुलीला पाहण्यासाठी कोणताही डॉक्टर आला नाही. समजावण्याच्या बहाण्याने रुग्णालयाच्या प्रमुखांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला," असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला.


दरम्यान, या प्रकरणावर रुग्णालयाने अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र ग्रेटर नोएडाचे पोलीस उपायुक्त अभिषेक वर्मा यांनी या वृत्ताला दुजोरा देत हा सर्व प्रकार यथार्थ हॉस्पिटलमधील असल्याचे त्यांनी सांगितले. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे आम्ही कारवाई करत आहोत. तपासादरम्यान, जे पुरावे हाती लागतील त्यानुसार आम्ही कारवाई करु असेही पोलीस उपायुक्तांनी सांगितले