राहुल गांधीच्या `रोड शो` मध्ये बलून स्फोट
रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी राहुल गांधींसाठी `आरती`ची व्यवस्था केली होती.
नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये 28 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूका आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी विधानसभा निवडणुक प्रचारासाठी मेहनत घेत आहेत. शनिवारी त्यांनी मध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये 8 किलोमीटरचा मोठा रोड शो केला. यावेळी एक विचित्र घटना घडली. खरतर रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी राहुल गांधींसाठी 'आरती'ची व्यवस्था केली होती. पण दिव्याच्या संपर्कात आल्याने तिथला फुगा फुटला आणि आग लागली आणि एक जोरदार स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणती गंभीर दुर्घटना घडली नाही.
जोरदार स्फोट
काही कार्यकर्ता राहुल गांधी यांच्या दिशेने आरतीचा ट्रे घेऊन चालले होते. दरम्यान चुकून दिवा फुग्यांच्या संपर्कात आला आणि जोरदार स्फोट झाला. जिथे फुगा फुटला तिथून काही अंतरावरच राहुल गांधी होते. स्फोटचा आवाज ऐकून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील काही वेळासाठी अचंबित झाले.
कार्यकर्त्यांची गर्दी
शनिवारी नर्मदा नदीची पूजा केल्यानंतर राहुल यांनी आपला आठ किलोमीटरचा रोड शो सुरू केला. अब्दुल हमीद चौकातून सुरू झालेल्या रोड शो ला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यांच्या स्वागतासाठी शंभरहून अधिक स्टेज लावण्यात आले होते.