Jadavpur University Ragging News: पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठाच्या वसतीगृहात पहिल्या वर्षात शिकणाऱ्या स्वप्नादिप कुंडूचा मृत्यू झालाय. वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून विद्यार्थी पडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पडून गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान स्वप्नादिन याचा मृत्यू झाला. इमारतीपासून काही फूट अंतरावर स्वप्नदीप कुंडू नग्नावस्थेत आढळून आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान त्याच्यावर रॅगिंग झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. स्वप्नदीपने बंगाली पदवी अभ्यासक्रमासाठी या विद्यापीठात प्रवेश घेतला होता. आता पालकांच्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली असून दोन आठवड्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. 


स्वप्नदीपने बाल्कनीतून उडी मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण रॅगिंगकडे निर्देश करणारी अनेक कारणेही समोर येत आहेत. स्वप्नदिपने त्याला भेडसावणाऱ्या समस्या सांगितल्या होत्या, त्याबद्दल त्याने एका शिक्षकालाही कळवले होते, असे त्याच्या मित्राने सांगितले. 


कुटुंबीय आणि मित्रांकडून रॅगिंगचा आरोप 


स्वप्नदिपने आईल फोन करुन आपल्या जीवाला धोका असल्याचे अनेकदा सांगितले होते. त्याला हंसखळी येथील नादियाच्या आपल्या घरी परतायचे होते, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. तर स्वप्नदीपचा मृत्यू काही सिनिअर विद्यार्थ्यांच्या रॅगिंगमुळे झालाय असे त्याच्या एका मित्राने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. तर स्वप्नदिपला नग्न अवस्थेत टेरेस्टवर धावडवण्यात आल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. 


बुधवारी रात्री 11.45 वाजता विद्यार्थी वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडला होता. अनेक जखमांमुळे त्याला खासगी रुग्णालयात नेले. दरम्यान गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती जॉइंट सीपी (गुन्हे) शंख शुभ्रा चक्रवर्ती यांनी दिली. 


विद्यापीठाकडून समिती स्थापन 


स्वप्नदीपच्या डोक्याच्या डाव्या बाजूला फ्रॅक्चर आणि इतर जखमा झाल्याचं प्राथमिक पोस्टमॉर्टममध्ये समोर आलं आहे. त्यांच्या मणक्यालाही फ्रॅक्चर झाले होते. काही विद्यार्थ्यांनी स्वप्नदीपच्या अवस्थेबद्दल रात्री 10 वाजता डीन रजत रे यांना फोन करुन माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वप्नदीपच्या मृत्यूच्या काही मिनिटे आधी त्यांनी डीनला फोन केला होता. परंतु त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. या मुद्द्यावर माध्यमांशी बोलण्यास डीन यांनी नकार दिला.


दरम्यान, 'ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अद्याप आमच्याकडे रॅगिंगची कोणतीही तक्रार आलेली नाही, मात्र समिती त्यावर लक्ष घालणार आहे, अशी प्रतिक्रिया', विद्यापीठाचे प्रो-व्हीसी अमितव दत्ता यांनी दिली.