मुंबई : Bank Locker New Rules : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँक लॉकरचे नियम बदलले आहेत. तुमचे कोणत्याही बँकेत लॉकर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन नियम लागू 


एक अधिसूचना जारी करून, रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की नवीन बँक लॉकर नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू असतील. बँकेत लॉकर घेणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीवरून आरबीआयने हे नियम जारी केले आहेत. नव्या नियमांच्या अंमलबजावणीचा थेट लाभ बँक ग्राहकांना मिळणार आहे.


100 पट नुकसान भरपाई द्यावी


अनेकदा बँकेच्या लॉकरमध्ये चोरी झाल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता बँकेच्या लॉकरमधून काही चोरी झाल्यास संबंधित बँकेच्यावतीने ग्राहकाला लॉकरच्या भाड्याच्या 100 पट भरपाई दिली जाईल. आतापर्यंत बँका चोरीच्या घटनांकडे दुर्लक्ष करून त्याला जबाबदार नसल्याचे सांगत होत्या.


ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट 


तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये एक्सेस कराल, तेव्हा ते तुम्हाला बँकेमार्फत ई-मेल आणि एसएमएसद्वारे अलर्ट केले जाईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी हा नियम आरबीआयने बनवला आहे.


जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी भाडे


नवीन नियमांनुसार बँकांना जास्तीत जास्त तीन वर्षांसाठी लॉकरचे भाडे घेण्याचा अधिकार आहे. जर तुमच्या लॉकरचे भाडे 2000 रुपये असेल तर बँक तुमच्याकडून इतर देखभाल शुल्क वगळता 6000 रुपयांपेक्षा जास्त आकारू शकत नाही.


सीसीटीव्ही फुटेज आवश्यक


आता लॉकर रूममध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवणे आवश्यक आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेजचा डेटा 180 दिवसांसाठी ठेवावा लागणार आहे. चोरी किंवा सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळल्यास आता पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करता येणार आहे.