लखनऊ: बनावट धनादेशाद्वारे राम मंदिर ट्रस्टच्या खात्यातून चोरी करण्यात आलेले सहा लाख रुपये अखेर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून परत करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. यानंतर राम मंदिरासाठी देशभरातून देणग्यांचा ओघ सुरु आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी दोन बनावट धनादेश तयार करून राम मंदिर ट्रस्टच्या खात्यातून अनुक्रमे ३.५ आणि २.५ लाख रूपये काढून घेतले होते. ही बाब समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हा रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्टेट बँकेला पत्र लिहून हे पैसे परत करण्याची मागणी केली होती. राम मंदिर ट्रस्च्या नावे असलेले पंजाब नॅशनल बँकेचे बनावट चेक संबंधितांकडून वठवण्यात आले, ही स्टेट बँकेची चूक आहे. त्यामुळे हे पैसे परत मिळावेत, अशी मागणी राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी केली होती. 



अखेर या विनंतीला मान देऊन स्टेट बँकेने सोमवारी सहा लाख रुपयांची रक्कम राम मंदिर ट्रस्टच्या खात्यात पुन्हा वळती केली. यानंतर रामजन्मभूमी ट्रस्टकडून स्टेट बँकेचे आभार मानण्यात आले आहेत. 
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर राम मंदिर ट्रस्टने चेकच्या माध्यमातून कोणतेही व्यवहार न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या यासाठी पर्यायी मार्गाचा विचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केल्यानंतर राम मंदिराचे काम जोरात सुरु झाले आहे. आतापर्यंत तीन ठिकाण मंदिरासाठी पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. आयआयटी चेन्नईकडून राम मंदिराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या २८ सप्टेंबरला आतापर्यंत झालेल्या कामाची पाहणी केली जाणार आहे.