...जेव्हा राहुल गांधी `रामभक्त` आणि कमलनाथ `गो भक्त` होतात!
सर्व-संमतीसहीत `रामभक्त` राहुल गांधी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार असल्याचा दावाही यावर करण्यात आलाय
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जवळ आल्यात, याची जाणीव अनेकांना आहे. पण, हे ठसठसशीतपणे कधी पटायला लागतं तर ते नेत्यांचे आणि पक्षांचे विविध होर्डिंग पाहिल्यानंतर... लोकसभा निवडणूक जवळ आल्यानंतर विकासाचे मुद्दे राहिले बाजुला पण राम मंदिर हा या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार की काय? अशी शंका यावी, एवढा चर्चेत आहे. सत्ताधारी भाजप पाठोपाठ काँग्रेसनंही राम मंदिराचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केलाय. ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भोपाळ दौऱ्यापूर्वी इथं वेगवेगळे बॅनर लावलेले दिसत आहेत. रस्त्यारस्त्यांवर झळकलेल्या या बॅनरवर राहुल गांधींना 'रामभक्त' संबोधण्यात आलंय. सोबतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना 'हनुमान भक्त' आणि 'गो भक्त' म्हटलं गेलंय.
भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हे बॅनर लावण्यात आलेत. सर्व-संमतीसहीत 'रामभक्त' राहुल गांधी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणार असल्याचा दावाही यावर करण्यात आलाय.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ८ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शहरातील जंबुरी मैदानात ते शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत, अशी माहिती मध्य प्रदेश काँग्रेस मीडिया सेलचे समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी दिलीय.
राज्यात 'जय किसान ऋण माफी योजना' लागू करण्यासाठी मध्य प्रदेशचे शेतकरी राहुल गांधी यांचं अभिनंदन करण्यासाठी येणार असल्याचंही सलुजा यांनी म्हटलंय.
यावेळी, मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासहीत काँग्रेस महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया तसंच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित राहतील.