Bareilly Minor Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील इज्जतनगर पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीवर 16 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या मुलीच्या घरात तिच्या व्यतीरिक्त कोणीच नसल्याची खात्री करुन घेतल्यानंतर अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने घरात एन्ट्री केली. त्यानंतर त्याने घरातील कुत्र्याला रस्सीने बांधून ठेवलं. हा कुत्रा आपल्याला चावू नये म्हणून या मुलाने कुत्र्याला बांधून ठेवलं. त्यानंतर हा मुलगा घरात शिरला आणि त्याने मोठ्या आवाजात टीव्ही लावला. मुलीचा आवाज शेजारच्यांना जाऊ नये म्हणून त्याने मोठ्या आवाजात टीव्ही लावला होता. त्यानंतर त्याने घरात एकट्याच असलेल्या मुलीवर त्याने बलात्कार केला.


शेजारच्यांनी केली तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीवर बलात्कार केल्यानंतर हा तरुण पळून गेला. दरम्यान टीव्हीचा फार आवाज येत असल्याने शेजारी घराबाहेर आले आणि त्यांनी नेमकं काय घडलंय हे शोधण्याचा प्रयत्न करेपर्यंत आरोपी फरार झाला होता. घरातून टीव्हीचा फार मोठ्याने आवाज येतोय असं शेजाऱ्यांनी या मुलीच्या नातेवाईकांना फोनवरुन कळवल्यानंतर नातेवाईकांनी घराकडे धाव घेतली. घरात गेल्यानंतर त्यांना मानसिक धक्का बसलेल्या मुलीने सर्व घटनाक्रम सांगितला.


वैद्यकीय चाचणी होणार


मुलीच्या नातेवाईकांनी या अल्पवयीन मुलाविरुद्ध बलात्कार, धमकावणे, मारहाण करणे याबरोबरच अनुसुचित जाती-जमातींविरोधातील कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर तातडीने आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या पीडित मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवलं आहे. या मुलीच्या वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतरच तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे सांगता येईल. हा अहवाल आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. 


घरी कोणी नसल्याचं पाहून...


दरम्यान, या आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. मुलीच्या घरात तिच्याशिवाय इतर कोणीही नसल्याची खात्री करुन घेतल्यानंतर आपण घरात प्रवेश केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. घरात ही मुलगी एकटीच असल्याचा फायदा घेत त्याने तिच्यावर बलात्कार केला. टीव्हीचा आवाज मोठा करण्याची कल्पना नेमकी कुठून आली, किती दिवस तो या मुलीवर पाळत ठेऊन होता यासारख्या गोष्टींचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणामुळे मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.