लैंगिक सुखाची मागणी, ऊसाचं शेत, Lipstick, ब्लाउज अन् 9 हत्या... Serial Killer अटकेत
Police Found Serial Killer Who Killed 9 Women: मागील 14 महिन्यांपासून तीन गावांमध्ये महिलांची रहस्यमय पद्धतीने हत्या केल्याची तब्बल 9 प्रकरणं समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
Police Found Serial Killer Who Killed 9 Women: उत्तर प्रदेश बरेलीमध्ये पोलिसांनी 14 महिन्यांपासून रहस्यमय पद्धतीने होणाऱ्या महिलांच्या हत्याप्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये कुलदीप गंगवार नावाच्या सिरीअल किलरला अटक केली आहे. या आरोपीने मागील 14 महिन्यांमध्ये 9 महिलांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. शुक्रवारी बरेली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती दिली आहे. हा आरोपी महिलांची हत्या करुन त्यांचे मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून द्यायचा असं पोलिसांनी सांगितलं आहे. या आरोपीबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांनी पत्रकार परिषदेत केलेत.
कोण आहे हा सिरीअल किलर?
बरेली पोलिसांचे एसएसपी असलेल्या अनुराग आर्य यांनी बरेली पोलिसांनी ऑप्रेशन तलाश मोहिमेअंतर्गत या आरोपीचा शोध घेतल्याचं सांगितलं आहे. कुलदीप हा मूळचा नवाबगंजचा रहिवासी आहे. तो ज्या तीन गावांमध्ये या महिलांच्या हत्या घडल्या तिथून 45 किलोमीरटवर राहतो, असं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी संभाव्य आरोपीची रेखाचित्रं जारी केली होती. शुक्रवारी आरोपीला अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "अनेकदा आरोपीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न आरोपीने यापूर्वी केला होता. अखेर त्याच्या या छळाला कंटाळून पत्नी काही वर्षांनी सोडून निघून गेली. त्यानंतर महिलांबद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला.
शेतात कोणती महिला एकटी काम करतेय हे शोधत फिरायचा
"मागील एक ते सव्वा वर्षापासून त्याने ज्या हत्या केल्या आहेत त्यापैकी 6 हत्या त्याने तीन गावांमध्ये केल्या आहेत. यामधील दोन गावांमध्ये त्याच्या बहीणी राहतात तर अन्य एका गावामध्ये त्याचे नातेवाईक आहेत. तो तेथील स्थानिक असल्याने तो गावांमधील शेतांमधून आणि निर्जन गल्ल्यांमधून फिरुन कोणी एकटी महिला फिरतेय का? शेतात काम करतेय का? याची चाचपणी करायचा. तो महिलांबरोबर अगदी आपुलकीने गप्पा मारायचा. त्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. अनेक महिलांबरोबर तो असं सहजपणे बोलायचा आणि बोलता बोलता निर्जनस्थळी घेऊन जायचा. निर्जनस्थळी गेल्यानंतर तो महिलांकडून लैंगिक सुखाची मागणी करायचा. महिलेने विरोध केल्यावर तो फार चिडायचा. त्यानंतर तो महिलांच्या साडीच्या पदारानेच त्यांचा गळा आवळून हत्या करायचा. एकाच हत्या प्रकरणामध्ये त्याने मृत महिलेने सलवार परिधान केला होता तर ओढणीने गळा दाबून तिला संपवलं," असं आर्या यांनी सांगितलं.
घटनास्थळी जाऊन तपास
तसेच पुढे बोलताना, "जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपीला हजर करण्याआधी पोलीसांनी सहा हत्या घडलेल्या ठिकाणांवर घेऊन जात सखोल तपास करत पुरावे गोळा गेले. नेमकं आरोपीने या महिलांना ठार मारण्याआधी काय केलं, घटनाक्रम कसा होता केलं? किती वाजता तो हे सारे प्रकार करायचा?" याची माहिती त्याच्याकडून घेतल्याचं पोलिसांना सांगितलं.
पुरस्काराप्रमाणे घेऊन जायचा मृत महिलांच्या गोष्टी
आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांना अजून गोष्ट जाणवली ती म्हणजे महिलांची हत्या केल्यानंतर एखाद्या बक्षिसाप्रमाणे अथवा चषकाप्रमाणे हा आरोपी महिलांकडील एखादी गोष्ट घेऊन जायचा. "दोन प्रकरणांमध्ये शेतात गवत कापायला गेलेल्या महिलांचा गळा आवळून त्यांना संपवल्यानंतर त्यांच्याकडील विळे तो घेऊन गेला होता. अन्य एका प्रकरणामध्ये महिलेच्या ब्लाऊजचा तुकडा त्याने नेला होता. अन्य एका प्रकरणात महिलेची टीकली आणि लिपस्टिक घेऊन गेला होता. या सर्व गोष्टी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. एका मृत महिलेचं आधारकार्डही त्याच्याकडे मिळालं आहे," असं पोलीस म्हणाले.
अन्य तीन प्रकरणांचाही करणार तपास
या प्रकरणामध्ये सदर 6 घटनांबरोबरच अन्य तीन घटनांमध्येही या आरोपीची चौकशी केली जाणार आहे. कारण या तीन महिलांनाही अन्य सहा महिलांप्रमाणेच ठार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणामध्ये आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे, असं पोलिसांना म्हटलं आहे.