नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या शासकीय सोहळ्यांचा आज समारोप होत आहे. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनाबाहेर विजय चौकात शानदार बिटींग द रिट्रीट सोहळा होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी राजधानीत आलेली विविध सैन्य दलं आज बिटींग द रिट्रीट ही मानाची परेड करून पुन्हा आपापल्या ठिकाणी परततील. त्या निमित्त लष्करी बँडपथकासह नेत्रदिपक असं संचलन दरवर्षी सादर केली जाते. यावर्षीच्या बिटींग द रिट्रीट सोहळ्यात भारतीय संगीतावर आधारीत धून ऐकायला मिळणार आहेत. २७ सादरीकरणं यावेळी साजरी होतील. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्यासह नवी दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफ यांचे बँड आणि संचलन सादर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ पैकी १९ धून या भारतीय संगीतकारांनी तयार केल्या आहेत. सारे जहा से अच्छा या सुंदर गीताच्या धूनने या सोहळ्याचा समारोप केला जाईल. या सोहळ्याचे प्रमुख संगीत संयोजक कमांडर विजय डी क्रूझ असणार आहेत. तर आर्मीच्या बँडचं संयोजन सुभेदार परविंदर सिंग करतील. नेव्ही आणि एअरफोर्सच्या बँडचं संयोजन मास्टर चीफ पेटी ऑफिसर व्हींसेंट जॉन्सन आणि ज्युनिअर वॉरंट ऑफिसर अशोक कुमार करणार आहेत. 


प्रजासत्ताक दिनाचा समारोप सोहळा विजय चौकात पार पडतो. 26 जानेवारीपासून सुरु झालेल्या प्रजासत्ताक दिनाचा हा समारोप सोहळा असतो. 1950 पासून ही परंपरा सुरु आहे. बीटिंग रिट्रीट सोहळ्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित असतात. यादरम्यान तिन्ही दलांचे प्रमुख राष्ट्रपतींना सलामी देतात. बीटिंग द रिट्रीट लष्कराच्या बॅरेक वापसीचे प्रतीक आहे. जगभरात बीटिंग द रिट्रीटची परंपरा आहे. लढाईच्या दरम्यान सूर्यास्त झाल्यानंतर सेना शस्त्र खाली ठेवून आपापल्या छावणीत परत जाते तेव्हा एक सांगतिक सोहळा होता. त्याला बीटिंग रिट्रीट म्हटले जाते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सेनेच्या वेगवेगळ्या तुकड्या दिल्लीत आलेल्या असतात.


1950 नंतर आतापर्यंत फक्त दोन वेळा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. 26 जानेवारी 2001 ला गुजरातमध्ये भूकंप झाल्यानंतर आणि 27 जानेवारी 2009 ला देशाचे आठवे राष्ट्रपती वेंकटरमन यांचे प्रदिर्घ आजारानंतर निधन झाल्यानंतर हा सोहळा रद्द करण्यात आला होता.


पाहा लाईव्ह