नवी दिल्ली : भारत- पाकिस्तानमध्ये असणारे तणावपूर्ण संबंध पाहता या दोन्ही देशांमधील परिस्थिती काही केल्या बदलण्याचं नाव घेत नाही आहे. २३ मार्च रोजी प्रतिवर्षी पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात येतो. पण, यंदाच्या वर्षी पाकिस्तान उच्चालयाच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला भारताकडून कोणही प्रतिनिधी पाठवण्यात येणार नाही आहे. शुक्रवारी हा समारंभ पार पडणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या समारंभाला फुटिरतावादी नेतेही उपस्थित असल्याचं कळत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्लीत मूळ राष्ट्रीय दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच २२ मार्चला हा समारंभ पार पडणार आहे. पण, पाकिस्तान उच्चालयाकडून फुटिरतावादी नेत्यांनाही या समारंभाचं निमंत्रण देण्यात आल्यामुळे भारताकडून कोणीही प्रतिनिधी न पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. १४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांतील तणाव वाढला असून, परिणामी अनेक मार्गांनी शेजारी राष्ट्राशी असणाऱ्या नात्यांमध्ये दुरावा राखण्यालाच भारताकडून प्राधान्य देण्यात येत आहे. 


दरम्यान, पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाचं निमित्तं साधत आयोजित समारंभात फुटिरतावादी नेत्यांपैकी कोणाची उपस्थिती असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ज्या दिवशी पाकिस्तानमध्ये मुस्लिम लीगकडून लाहोर मांडण्यात आलेला स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मंजूर केला तो दिवस पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. २३ मार्च १९४० रोजी हा ठराव मंजूर करण्यात आला होता. ज्यानंतर २३ मार्च, १९५६ मध्ये पाकिस्तानने पहिल्या संविधानाचा स्वीकार केला. यंदाच्या वर्षी पार पडणाऱ्या या समारंभात मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथिर मोहम्मद प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत.