प्रियंका गांधींविरोधात अमेठीत अशीही पोस्टरबाजी
अमेठीत प्रियंका गांधी यांच्याविरोधात पोस्टरवॉर
अमेठी : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा बुधवारी २७ मार्च रोजी अमेठीमध्ये दाखल होत आहेत. अमेठीत मुसाफिरखाना येथे प्रियंका गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. परंतु अमेठीत पोहचण्याआधीच प्रियंका गांधी यांच्याविरोधात पोस्टर वॉर सुरू करण्यात आलं आहे. प्रियंका गांधी बैठक घेणार असल्याच्या मुसाफिरखाना येथील रस्त्यांवर ठिक-ठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत.
अमेठीत लावण्यात आलेल्या पोस्टरवर समाजवादी पार्टी विद्यार्थी नेता जयसिंह प्रताप यादव याचे नाव लिहिण्यात आले आहे. 'क्या खूब ठगती हो, क्यो पांच साल बाद ही अमेठी दिखती हो. ६० सालो का हिसाब दो', 'मई २०१४ मे किया था वादा, ५ साल बाद क्या लेके आई हो फिर, अमेठी को छलने का इरादा है. ६० सालों का हिसाब दो' अशा प्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली आहे. प्रयागराज आणि वाराणसी दौऱ्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी प्रियंका गांधी-वाड्रा एकदिवसीय दौऱ्यासाठी अमेठीत दाखल होत आहेत. 'देख चुनाव पहन ली सारी, नही चलेगी ये होशियारी' असे लिहिण्यात आलेले पोस्टर मुसाफिरखाना येथील रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.
प्रियंका गांधी 'मेरा बूथ, मेरा गौरव' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रियंका गांधी अमेठी संसदीय क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना संबोधित करणार आहे. समाजवादी नेत्याद्वारा प्रियंका गांधी यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या या पोस्टरनंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. अमेठीमध्ये याआधीदेखील अशाप्रकारची फलके लावण्यात आली होती. ३ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेठी दौऱ्यावर होते. त्यावेळी देखील अशाच प्रकारे पोस्टर वॉर करण्यात आला होता. या पोस्टरमधून 'जुमला नही जवाब चाहिए, पांच साल का हिसाब चाहिए' असे पोस्टर लावण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकांच्या आधी मतदारांची भेट घेऊन प्रचार करण्यात येत आहे. प्रियंका गांधी यांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यानही अशाच प्रकारे पोस्टरबाजी करण्यात आली होती. अयोध्येत लावण्यात आलेल्या फलकांवर प्रियंका गांधींचा रामभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. लोकसभा निवडणूक २०१९ च्या तोंडावर विरोधी पक्षांकडून अशाप्रकारे करण्यात येणारी पोस्टरबाजी, नेत्यांचे दौरे यांमुळे राजकीय वर्तुळात निवडणूक प्रचाराचे वारे चांगलेच वाहताना दिसत आहेत.