घराबाहेर खेळणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या मुलीला कारने चिरडले; CCTV त कैद झाला धक्कादायक मृत्यू
Bengaluru Accident : बंगळुरुमध्ये एका कारचालकाने घरासमोर खेळणाऱ्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीला मागच्या चाकाखाली चिरडलं आहे. या दुर्घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Bengaluru Accident : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एक दुर्दैवी अपघात झाला आहे. कारखाली चिरडून घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पार्किंग परिसरातून बाहेर पडत असताना आलिशान कारने घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्या मुलीला चिरडून टाकलं आहे. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बंगळुरूच्या कासुविनाहल्ली येथील समृद्धी अपार्टमेंटसमोर कारने चिरडल्याने तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या जोग जुथार याच्या मुलीचा मृत्यू झाला. जोग जुथार हा मूळचा नेपाळचा रहिवासी असून त्याची मुलगी अरबिना (3) याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली असून तब्बल आठवड्याभरानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेबाबत बेलंदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कार चालकाचे घरासमोर खेळणाऱ्या मुलीकडे लक्ष न दिल्याने कारने तिला चिरडले. सुरक्षा रक्षक जोगन जुथारने मुलीला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले होते. मात्र खांद्याचे हाड तुटल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलीला पुढील उपचारांची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर पालकांनी मुलाला संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. मुलीची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला तात्काळ निम्हान्स रुग्णालयात दाखल करण्याचे सुचवले. मात्र निम्हान्स रुग्णालयात नेत असताना वाटेतच मुलीचा मृत्यू झाला.
समृद्धी अपार्टमेंटमधील चालकाने कार घरासमोर खेळणाऱ्या अरबिनावर चढवली. यामुळे कारचे मागील चाक तिच्या अंगावरुन गेले. ज्या कारने मुलीला धडक देऊन चिरडले ती कार त्याच अपार्टमेंटमधील एका व्यक्तीची असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अतिरक्तस्त्रावामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी 10 डिसेंबर रोजी बेलंदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अपार्टमेंटजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी कारचालकाने मुलीला कारने चिरडल्याचे आढळले. न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी बेलांदूर वाहतूक पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे.
दरम्यान, अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातून समोर आली आहे. हरदोई येथे शनिवारी एका स्कॉर्पिओ कारने महिला व मुलांना चिरडले होते. मृत महिला मुलगा आणि पुतण्यासोबत रस्त्याच्या कडेने चालली होती. त्याचवेळी दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने तिघांनाही धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.