उत्तरप्रदेशमध्ये फटाक्यांचा स्फोट; १० जण ठार
ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती
भदोही : उत्तरप्रदेशातील भदोहीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भदोहीतील चौरीतील रोटहा भागात शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका फटाके व्यवसायिकाच्या घरी भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानय होता की स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.
भदोही-बाबतपुर मार्गावर असलेल्या चौरी भागात रोटहा गाव आहे. या गावातील रहिवासी इरफान मंसूरी फटाके बनवण्याचा तसेच विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या घरातच फटाक्यांचे दुकान चालू केले होते. फटाक्यांचा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटात मृत्यूमुखी झालेल्यांच्या मृतदेहाचे तुकडे तसेच सामानाचे तुकडे ४०० मीटर लांब उडाले. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
ढिगाऱ्याखालून आणखी काही मृतदेह असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. हा स्फोट कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. घटनास्थळी पोलीस, प्रशासन दाखल झाले असून असून बचावकार्य सुरू आहे.