`अयोध्येत राम मंदिर बनणं निश्चित`
अयोध्येमध्ये राम मंदिर बनणं निश्चित आहे. मंदिरसोडून काहीही बनू शकत नाही
नागपूर : अयोध्येमध्ये राम मंदिर बनणं निश्चित आहे. मंदिरसोडून काहीही बनू शकत नाही, असं वक्तव्य आरएसएसचे नवनिर्वाचित सरकार्यवाह (महासचिव) भैयाजी जोशींनी केलं आहे. मंदिर बनवण्यासाठी एका प्रक्रियेतून जावं लागेल, असं भैय्याजी जोशी म्हणाले. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मंदिर निर्माणाचं काम सुरु होईल, असा विश्वास भैय्याजी जोशींनी व्यक्त केला.
'सहमती बनणं सोपं नाही'
न्यायालयाबाहेर राम मंदिर बांधण्यासाठी सहमती बनणं सोपं नसल्याचं जोशी म्हणाले. नागपूरमध्ये संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेनंतर भैय्याजी जोशींनी माध्यमांशी संवाद साधला.
चौथ्यावेळा सरकार्यवाह म्हणून निवड
भैय्याजी जोशी यांची शनिवारी चौथ्यांदा सरकार्यवाह म्हणून निवड करण्यात आली. २००९ सालापासून जोशी लागोपाठ या पदावर कायम आहेत. आता २०२१ पर्यंत जोशीच या पदावर कायम राहतील. सरकार्यवाह या पदाचा कार्यकाल ३ वर्षांचा असतो.
दत्तात्रय होसबळेंच्या नावाची होती चर्चा
प्रतिनिधी सभेच्या बैठकीआधी दत्तात्रय होसबळे हे संघाचे नवे सरकार्यवाह होतील अशी चर्चा होती. भैय्याजी जोशी यांनीही पुन्हा सरकार्यवाहपद घ्यायला नकार दिला होता. पण संघाचे वरिष्ठ जोशींनाच पुन्हा सरकार्यवाह करण्यासाठी आग्रही होते.