नवी दिल्ली :  भारतीय जनता पार्टीने (BJP) राज्यसभेसाठी (Rajya Sabha Election 2022) आपला तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने माजी मंत्री डॉ अनिल बोंडे, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यानंतर कोल्हापुरातून धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या रुपात तिसरा उमेदवार दिलाय. (bhartiya janta party announced her 3rd candidate for rajya sabha election 2022 dhananjay mahadik get chance) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने महाराष्ट्रातून 6 जागांसाठी 7 उमेदवार झाले आहेत. त्यामुळे आता शिवसेना-भाजप आमनेसामने आले आहेत. तसेच राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय. 


महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 6 जागा


महाराष्ट्रातून राज्यसभेवर 6 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे 6 जागांसाठी ही 10 जूनला निवडणूक पार पडणार आहे. या 6 पैकी भाजपने 3, शिवसेनेने 2 , तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 1 उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे 6 जागांसाठी आता 7 उमेदवार रिंगणार आमनेसामने असणार आहेत.


कोण आहेत धनंजय महाडिक? 


धनंजय महाडिक हे माजी खासदार राहिले आहेत. महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकलेही. मात्र 2019 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर महाडिकांनी भाजपात प्रवेश केला.


शिवसेना-भाजप आमनेसामने


दरम्यान भाजपने कोल्हापुरातून महाडिकांना संधी दिल्याने शिवसेना-भाजप आमनेसामने आले आहेत. शिवसेनेने याआधीच कोल्हापुरातून संजय पवार यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपात कडवी झुंज पाहायला मिळू शकते.


काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी? 


दरम्यान भाजपपाठोपाठ काँग्रेसनेही महाराष्ट्रातून आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलंय. काँग्रसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगडी यांना संधी दिलीय. तसेच माजी अर्थमंत्री पी चिदंबरम, अजय माकन, जयराम रमेश आणि मुकुल वासनिकांनाही संधी दिली आहे.