भय्यूजी महाराज यांची शेवटची मुलाखत फक्त 'झी २४ तास'वर


भोपाळ : महाराष्ट्रामध्ये भाजप-शिवसेनेची युती टिकावी, अशी इच्छा अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केली होती. 'झी २४ तास'चे प्रतिनिधी निनाद झारे यांना त्यांनी नुकतीच मुलाखत दिली होती. हीच त्यांची अखेरची मुलाखत ठरली आहे. मात्र बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र राहायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमुळं एकच खळबळ उडालीय. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. भय्यू महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु. सर्वपक्षीय राजकारण्यांचे आणि उद्योगपतींचे हायप्रोफाईल गुरु. वयाच्या ५०व्या वर्षी स्वतःवरच गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. देशाचा कारभार चालवणाऱ्या राजकारण्यांना उपदेशांचे डोस पाजणाऱ्या भय्यू महाराजांनी स्वतःच आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालीय. मृत्यूआधी त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडलीय. माझ्या आत्महत्येला कुणीही जबाबदार नाही, असं त्यांनी त्यात स्पष्ट केल्याचं समजतंय.


मात्र कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. सोमवारी संध्याकाळी त्यांच्या इंदूरमधील आश्रमात कुटुंबियांमध्ये जोरदार वाद झाला होता. भय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नानंतर घरामध्ये तणावाचं वातावरण होतं. दरम्यान,  कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली, असं देखील बोललं जातंय.



भय्यू महाराज यांच्या कारकिर्दीत अनेक वादांमुळं ते चर्चेत राहिले. नोव्हेंबर २०१५मध्ये त्यांनी पहिली पत्नी माधवी यांचं निधन झालं. त्याआधी दोघांमधील पती-पत्नीच्या नात्यात तणाव होता, अशी चर्चा होती. त्यांना पहिल्या पत्नीपासून कुहू नावाची एक मुलगी आहे. गेल्यावर्षी ३० एप्रिल २०१७ रोजी भय्यू महाराजांनी डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी दुसरं लग्न केलं. आयुषी या मूळच्या शिवपुरीच्या असून, त्यांनी पीएचडी केलीय. आयुषी यांचे कुटुंबीय भय्यू महाराजांचे शिष्य आहेत. आई आणि बहिणीच्या आग्रहावरूनच भय्यू महाराजांनी दुसरं लग्न केल्याचं सांगितलं जातं. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या लग्नाच्या दिवशीच मल्लिका राजपूत नावाच्या एका महिलेनं गंभीर आरोप केले होते. भय्यू महाराजांनी आपल्याला मोहजालात बांधून ठेवलं असून ते लपूनछपून मला फोन करतात. ते धोकेबाज आहेत. आपण लिहिलेल्या त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रतीही त्यांनी जबरदस्तीनं लपवून ठेवल्यात, असे सनसनाटी आरोप राजपूत हिनं केले होते. मात्र भय्यू महाराजांकडून त्याचा सपशेल इन्कार करण्यात आला.


मे २०१६ मध्ये पुण्यातील रांजणगावजवळ भय्यू महाराजांवर प्राणघातक हल्ला झाला होता. पुण्यात मुलीला भेटून इंदूरलला परतत असताना, त्यांच्या ऑडी गाडीला मागून येणाऱ्या ट्रकनं धडक दिली होती. त्याचदिवशी रात्री मनमाड-मालेगाव घाटात त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर १५ ते २० अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती. मात्र त्या हल्ल्यातून ते सुखरूप बचावले होते.


भय्यू महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. मात्र त्यानंतर त्यांनी ही घोषणा फिरवली.. एवढंच नव्हे तर संन्यस्थाश्रमातून ते पुन्हा गृहस्थाश्रमात परतले.


एकीकडं स्वतःला राष्ट्रसंत म्हणवणारे भय्यू महाराज आलिशान जीवन जगायचे.. छानछान कपडे, हातात रोलेक्सची घड्याळ, फिरायला मर्सिडीज आणि ऑडीसारख्या महागड्या गाड्या, अशी त्यांची जीवनशैली होती. तरूणवयात त्यांनी सियारामसारख्या ब्रँडसाठी मॉडेलिंग देखील केलं होतं... आपल्या शिष्यांसाठी ते आदर्श मॉडेलच होते, पण आत्महत्या करून त्यांनी स्वतःच निर्माण केलेले आदर्श धुळीस मिळवले.