नवी दिल्ली : तुम्ही डिजिटल व्यवहार करण्यासाठी सरकारने सुरु केलेलं भीम अॅप्लिकेशन वापरता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करावे यासाठी सरकारने नागरिकांना आवाहन केलं. डिजिटल व्यवहार करण्यासाठी सरकारने भीम अॅप्लिकेशनही सुरु केलं. तुम्हीही भीम अॅप्लिकेशनचा वापर करत असाल तर मग तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण, १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापासून तुम्हाला भीम अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मोठा कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे.


‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑइ इंडिया’ (एनपीसीआय) तर्फे सुरु करण्यात आलेल्या भीम अॅप यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस आहे. एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक सीईओ एपी होटा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली की, “आम्ही सरकारसोबत बोलणं झालं आहे. १५ ऑगस्टपासून भीम अॅपच्या युजर्सला मोठा कॅशबॅक देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. भीम अॅपचा वापर वाढण्याच्यादृष्टीने कंपनीने ही ऑफर जाहीर केली आहे. या प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, १५ ऑगस्टपर्यंत आम्हाला परवानगी देण्यात येईल.”


सध्या डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे वेगवेगळी अॅप्लिकेशन्स वापरणा-यांच्या संख्येत वाढ होत आहे. या अॅप्लिकेशनकडून ग्राहकांना विविध सुविधा देऊन आकर्षित करण्यात येत आहे. सध्या एखादा युझरने दुस-या युझरला भीम अॅप्लिकेशन वापरण्यासाठी प्रोत्साहीत केल्यास त्याला त्याबदल्यात २५ रुपये मिळतात.


भीम अॅपच्या युजर्सला सध्या १० ते २५ रूपयापर्यंत कॅशबॅक मिळतोय. भीम अॅपवर यापेक्षा जास्त कॅशबॅक देण्याच्या प्रस्तावाला १५ ऑगस्ट पर्यंत मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे.


नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णयानंतर डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भीम अॅप्लिकेशनची निर्मिती केली होती. डिसेंबरमध्ये हे अॅप सुरु करण्यात आलं होतं. भीम अॅपला अल्पावधीतच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पहायला मिळालं.