भिवंडी हादरलं! निर्जन स्थळी आढळला शाळकरी मुलीचा मृतदेह
Bhiwandi Crime: अल्पवयीन शाळकरी मुलीची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली.
Bhiwandi Crime: भिवंडी आणि कल्याण सीमेवर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. येथील गांधारी पुलानजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्तान परिसरातील निर्जन स्थळी अल्पवयीचा मृतदेह सापडला. याचा तपास केला असता मुलीची निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक पडघा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहे.
कल्याण शहरातील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक 13 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलगी सोमवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता होती. यासंदर्भात मुलीच्या पालकांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता. या अपहरण झालेल्या मुलीचा शोध स्थानिक कल्याण पोलीस घेत आहेत. दरम्यान मंगळवारी सकाळी या मुलीचा मृतदेह बापगाव येथील कब्रस्तान नजीकच्या निर्जन स्थळी आढळून आला. यानंतर परिसरातील नागरिकांच्या पायाखालची जमिनच सरकली. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली.
अल्पवयीन शाळकरी मुलीची निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. हत्या करण्याआधी तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. भिवंडी आणि कल्याण परिसरात मागील काही दिवसात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. यानंतर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.