भोपाळ : भक्ती शर्मा..... भोपाळमधल्या बरखेड़ी अब्दुल्ला गावची सरपंच.... राज्यशास्त्रात एम ए केलेली भक्ती 2012 साली अमेरिकेत नोकरी करण्यासाठी गेली.... पण भक्तीनं भारतातच राहावं आणि आपल्या गावासाठी, गावातल्या महिलांच्या विकासासाठी काहीतरी करावं, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्तीनं अमेरिकेतली नोकरी सो़डली आणि 2013 साली ती गावात परतली. दोन वर्ष गावात सामाजिक काम केल्यानंतर तिनं सरपंचपदाची निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि 2015 साली भक्ती शर्मा गावची सरपंच झाली.... 


गेल्या अडीच वर्षांत भक्तीनं गावचा चेहरामोहराच बदलून टाकलाय.... गावात रस्ते झाले, वीज आली, पाणी आलं..... त्याचबरोबर गावातल्या अनेक तरुणांचं गुटख्याचं व्यसन सुटलं. 



बरखेड़ी अब्दुल्ला गावात भक्तीनं दोन शाळा आणि अंगणवाड्या सुरू केल्या.  यामध्ये सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतायत. विशेष म्हणजे बरखेड़ी अब्दुल्ला गावातल्या या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती असते. 


देशातल्या 100 प्रसिद्ध महिलांच्या यादीत सरकारनं भक्ती शर्माचा समावेश केलाय... तिच्या या योगदानासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिचा सन्मानही करण्यात आलाय.