बिहार विधानसभा निवडणुकीआधी आरजेडीला मोठा धक्का
बिहार विधानसभा निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी 4 आमदारांनी राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) मोठा धक्का दिला आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून आरजेडीने तीन आमदार प्रेमा चौधरी, महेश्वर यादव आणि फराज फात्मी यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित केले होते. त्याचबरोबर सासारामचे आरजेडीचे आमदार अशोक कुमार कुशवाह यांनीही जेडीयूमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
चार पैकी तीन आमदार आज जेडीयूमध्ये सामील होतील, तर फराज फात्मी अद्याप जेडीयूमध्ये जाणार की नाही याबाबत समोर आलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक कुशवाह आज जनता दल युनायटेड (जेडीयू) मध्ये प्रवेश करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक कुमार दुपारी तीन वाजता जेडीयू कार्यालयात पोहोचतील आणि तिथे पक्षाचे सदस्यत्व स्वीकारतील.
आरजेडीने पक्षविरोधी कारवायांमुळे आमदार प्रेमा चौधरी, महेश्वर यादव आणि फराज फात्मी यांना पक्षातून निलंबित केले होते. आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या आदेशानुसार या सर्वांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्याआधी हे आमदार जेडीयूमध्ये जाण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा होत्या.
मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारमधील मंत्रीपदावरून काढून टाकण्यात आल्यानंतर श्याम रजक सोमवारी आरजेडीमध्ये दाखल झाले. तेजस्वी यादव यांनी श्याम रजक यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. आरजेडीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर श्याम रजक म्हणाले की, 'आपल्या घरी परत आल्यानंतर पुन्हा सामाजिक न्यायासाठी लढा उभारला जाईल. मी जेडीयूमध्ये असताना सामाजिक न्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न केला. लालू यादव यांनी नेहमीच आम्हाला सामाजिक न्यायाची लढाई लढण्याचा धडा शिकवला आहे.'